Shahid Kapoor : शाहिद कपूरने 'फर्जी २'साठी घेतलं तगडं मानधन? वेबसीरिज या दिवशी येणार भेटीला
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2025 18:27 IST2025-10-17T18:26:14+5:302025-10-17T18:27:38+5:30
Farzi 2 Web Series : २०२३ साली शाहिद कपूरने ब्लॅक कॉमेडी क्राईम थ्रिलर वेब सिरीज 'फर्जी'सह ओटीटीवर पदार्पण केले होते. 'द फॅमिली मॅन' फेम राज आणि डीके यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या या सीरिजने खूप प्रसिद्धी मिळवली होती. आता निर्मात्यांनी 'फर्जी सीझन २' ची तयारी सुरू केली आहे.

Shahid Kapoor : शाहिद कपूरने 'फर्जी २'साठी घेतलं तगडं मानधन? वेबसीरिज या दिवशी येणार भेटीला
२०२३ साली शाहिद कपूरने ब्लॅक कॉमेडी क्राईम थ्रिलर वेब सिरीज 'फर्जी'सह ओटीटीवर पदार्पण केले होते. 'द फॅमिली मॅन' फेम राज आणि डीके यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या या सीरिजने खूप प्रसिद्धी मिळवली होती. याला 'फिल्मफेअर ओटीटी अवॉर्ड्स'मध्ये १० नॉमिनेशन मिळाले होते. 'ऑरमॅक्स'नुसार, ती त्या वर्षीची सर्वाधिक पाहिली गेलेली वेबसीरिज होती, जी ३७ दशलक्ष प्रेक्षकांनी पाहिली होती. आता बातमी आहे की निर्मात्यांनी 'फर्जी सीझन २' ची तयारी सुरू केली आहे. स्क्रिप्ट लिहिण्याचे काम सुरू आहे आणि लवकरच त्याचे शूटिंग सुरू होईल. पण 'फर्जी २'मध्ये शाहिद कपूरच्या मानधनाबद्दल सर्वात मोठा दावा केला जात आहे. अभिनेत्याला त्याच्या कारकिर्दीतील आतापर्यंतची सर्वात जास्त फी ऑफर करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
'फर्जी २'च्या चर्चा सुरू होताच अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. पहिल्या सीझनमध्ये शाहिद कपूरसोबत विजय सेतुपती, के के मेनन, राशी खन्ना आणि भुवन अरोरा दिसले होते. बनावट नोटांच्या गैरव्यवहारावर आधारीत या सीरिजमध्ये पुन्हा या कलाकारांच्या पुनरागमनाची चिन्हे आहेत. एवढेच नाही तर, पहिल्या सीझनच्या एका सीनमध्ये त्याला 'द फॅमिली मॅन'शी देखील जोडले गेले होते, त्यामुळे दुसरा सीझन या दोन्ही सुपरहिट वेबसीरिजला एकत्र आणणार आहे का, अशा अपेक्षा वाढल्या आहेत.
शाहिद कपूरचं मानधन
'बॉलिवूड हंगामा'च्या रिपोर्टनुसार, दिनेश विजानच्या 'कॉकटेल २' नंतर शाहिद कपूरच्या हाती आणखी एक मोठी डील लागली आहे. रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, शाहिद या सीरिजसाठी ४० कोटी रुपये मानधन घेत आहे. ही रक्कम पाहून अनेकांनी भुवया उंचावल्या आहेत. कारण तो सामान्यतः एका चित्रपटासाठी २५ ते ३० कोटी रुपये मानधन घेतो असे सांगितले जाते.
'फर्जी २'च्या शूटिंगला जानेवारीत होणार सुरूवात
शाहिद कपूर पुढील वर्षी जानेवारी २०२६ पासून 'फर्जी सीझन २'चे शूटिंग सुरू करणार आहे. सध्या सीरिजची स्क्रिप्ट लिहिण्याचे काम सुरू आहे. अॅमेझॉन प्राइम व्हिडीओ, राज आणि डीके यांच्यासोबत मिळून जानेवारी २०२६ पासून दुसऱ्या सीझनचे शूटिंग सुरू करणार आहेत. यासाठी शाहिद सलग ६ महिने शूटिंग करेल. यासाठी तो ४० कोटी रुपये फी घेत आहे. सर्व काही ठीक राहिले, तर 'फर्जी सीझन २' २०२६ च्या अखेरीस किंवा २०२७च्या सुरुवातीला प्राइम व्हिडीओवर रिलीज होईल.'
वर्कफ्रंट
शाहिद कपूरचे सध्या 'कॉकटेल २'च्या शूटिंगवर लक्ष केंद्रित आहे. रश्मिका मंदाना आणि क्रिती सेनन यांच्यासोबत तो या वर्षी डिसेंबरमध्ये त्याचे शूटिंग पूर्ण करेल. चित्रपटाचे निर्माते दिनेश विजान २०२६ मध्ये हा चित्रपट मोठ्या पडद्यावर रिलीज करण्याच्या तयारीत आहेत. 'कॉकटेल २' चे शूटिंग संपल्यानंतर शाहिद 'फर्जी २'च्या शूटिंगला सुरूवात करेल.