"आम्ही काही मैत्रिणी नाही आहोत...", लारा दत्तासोबत काम केल्यावर रिंकू राजगुरुची प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2025 12:47 IST2025-12-18T12:45:11+5:302025-12-18T12:47:23+5:30
लारा दत्तासोबत रिंकूने 'या' वेबसीरिजमध्ये केलं काम

"आम्ही काही मैत्रिणी नाही आहोत...", लारा दत्तासोबत काम केल्यावर रिंकू राजगुरुची प्रतिक्रिया
मराठी अभिनेत्री रिंकू राजगुरुला सगळेच 'सैराट' सिनेमामुळे ओळखतात. या सिनेमानंतर तिने अनेक मराठी सिनेमे केले. इतकंच नाही तर ती हिंदीतही झळकली. २०२० साली तिने लारा दत्तासोबत 'हंड्रेड' ही हिंदी वेबसीरिज केली होती. त्यात दोघींचीही वेगळीच भूमिका होती. लारा दत्तासोबत काम करतानाचा अनुभव कसा होता यावर नुकतीच रिंकूने प्रतिक्रिया दिली.
'लोकमत फिल्मी'च्या नो फिल्टरला दिलेल्या मुलाखतीत रिंकू राजगुरु म्हणाली, "सेटवर असे काही किस्से घडले नाहीत. कारण आम्ही काही मैत्रिणी नाही आहोत. आमच्या वयातही खूप फरक आहे. त्यांना मी सेटवर मुलीसारखीच होते. त्या मला विचारायच्या, 'रिंकू खाना खाया? ओके,चलो शॉट करेंगे?' इतकं ते साधं होतं. हिंदीत सगळे खूप प्रोफेशनल काम करतात. काम झालं की सगळे आपापल्या व्हॅनिटीत जातात. आपलं काम, वेळेत येणं, टापटीप असणं, लक्ष देऊन काम करणं हेच मीही शिकले."
ती पुढे म्हणाली,"माणूस म्हणून लारा दत्ता खूप विनम्र आहेत. एवढ्या मोठ्या कलाकाराबरोबर सीन द्यायचा म्हटल्यावर आपल्याकडून रिटेक नको व्हायला याचं दडपण येतं. पण त्या खूपच सहज असायच्या. 'ठिके, होता है..करेंगे हम अच्छेसे करेंगे' असं त्या म्हणायच्या. इतक्या त्या गोड आहेत. माणूस म्हणूनच त्या कमाल आहेत. त्यामुळे त्यांच्यासोबत खूप मजा आली. त्यांना सैराट पाहिला होता. तुझं काम खूप आवडलं असं त्या म्हणाल्या. कोणी असं इतकं साधं, एका वाक्यात कौतुक केलेलंच मला आवडतं. कोणी जास्तच बोलत असेल तेव्हा वाटतं की हे खरंच बोलतायेत की फेक बोलतायेत. त्या खूप लाऊड नाहीयेत. अगदी शांत आहेत. बोलायचं म्हणून त्या बोलत नाहीत पण तर मोजकंच बोलतात."
'हंड्रेड' सीरिजमध्ये रिंकूने नेत्रा पाटीलची भूमिका साकारली होती. तर लारा दत्ता एसीपी सौम्या शुक्लाच्या भूमिकेत होती. सीरिजमध्ये करण वाही, परमीत सेठी यांनीही काम केलं होतं. ही एक कॉमेडी सीरिज होती.