फुलेरात पुन्हा येण्याची तयारी सुरु करा! 'पंचायत ५'ची अधिकृत घोषणा, 'या' दिवशी रिलीज होणार
By देवेंद्र जाधव | Updated: July 7, 2025 14:34 IST2025-07-07T14:33:04+5:302025-07-07T14:34:25+5:30
Panchayat Season 5 Release Date: प्राईम व्हिडीओने नुकतीच 'पंचायत ५'ची अधिकृत घोषणा केली आहे. याशिवाय पुढील सीझनची रिलीज डेटही जाहीर केली आहे

फुलेरात पुन्हा येण्याची तयारी सुरु करा! 'पंचायत ५'ची अधिकृत घोषणा, 'या' दिवशी रिलीज होणार
Panchayat 5 Release Date: 'पंचायत ४' वेबसीरिज काही दिवसांपूर्वी रिलीज झाली. या वेबसीरिजच्या चौथ्या सीझनलाही प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. अशातच प्राइम व्हिडीओने 'पंचायत ४'नंतर नुकतीच 'पंचायत'चा पुढील सीझन अर्थात 'पंचायत ५'ची घोषणा केली आहे. प्राइम व्हिडीओने वेबसीरिजचं अधिकृत पोस्टर शेअर करत सर्वांना ही आनंदाची बातमी दिली आहे. इतकंच नव्हे 'पंचायत ५'ची रिलीज डेटही सांगितली आहे. जाणून घ्या याविषयी
या दिवशी रिलीज होणार 'पंचायत ५'?
'पंचायत ५' वेबसीरिजची घोषणा करताना प्राइम व्हिडीओने वेबसीरिजच्या पुढील सीझनचं अधिकृत पोस्टर शेअर केलं आहे. या पोस्टरमध्ये 'पंचायत' वेबसीरिजची गँग पुन्हा दिसत आहे. विशेष गोष्ट म्हणजे या पोस्टरमध्ये बिनोदला सर्वांनी उचललेलं दिसत असून सर्व त्याच्याकडे कौतुकाने बघत आहेत. बिनोद सुद्धा आनंदात जल्लोष करताना दिसत आहे. प्रधानजी आणि मंजू देवी यांच्या हातात लौकी (दुधी) दिसत आहे. अशाप्रकारे वेबसीरिजच्या पोस्टरने प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण होईल. 'पंचायत ५' पुढील वर्षी अर्थात २०२६ ला सर्वांच्या भेटीला येणार आहे.
'पंचायत ५'मध्ये बिनोदची पुन्हा उत्सुकता
'पंचायत ४' बिनोदने गाजवला. प्रधानजी, सचिवजी, प्रल्हाद, विकास आणि मंजू देवी बिनोदला त्यांच्या पार्टीत यायला सांगतात. 'हम गरीब हू, गद्दार नाही', असं म्हणत बिनोद त्यांची ऑफर नम्रपणे धुडकावून लावतो. इतकंच नव्हे शेवटी जेव्हा भूषणची पत्नी क्रांती देवी विजयी होते तेव्हा बिनोद प्रेमाने प्रधानजी, मंजू देवी यांना लाडू द्यायला येतो. एकूणच 'पंचायत ४' बिनोदने गाजवला. त्यामुळे 'पंचायत ५' मध्ये बिनोदसाठी फुलेरावासी काय करणार? याशिवाय क्रांती देवी प्रधान झाल्यावर बिनोदवर कोणती मोठी जबाबदारी येणार का? या सर्व प्रश्नांची उत्तरं पुढील सीझनमध्ये मिळतील. यासाठी प्रेक्षकांना २०२६ पर्यंत वाट बघावी लागेल.