'मिर्झापूर'मध्ये झाली जितेंद्र कुमारची एन्ट्री, 'सचिवजी' आता साकारणार 'ही' भूमिका, फोटो व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2025 15:33 IST2025-11-21T15:27:19+5:302025-11-21T15:33:08+5:30
मिर्झापूरमध्ये जितेंद्र कुमार सचिवजी नाही तर वेगळीच भूमिका साकारणार असल्याची चर्चा आहे, जाणून घ्या. समोर आली मोठी माहिती

'मिर्झापूर'मध्ये झाली जितेंद्र कुमारची एन्ट्री, 'सचिवजी' आता साकारणार 'ही' भूमिका, फोटो व्हायरल
ओटीटीवरील सर्वात लोकप्रिय असलेल्या 'मिर्झापूर' (Mirzapur) या वेबसीरिजचा सिनेमा आता लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येण्याची तयारी करत आहे. 'मिर्झापूर द फिल्म'बद्दल चाहत्यांमध्ये वाढत असलेल्या उत्सुकतेदरम्यान, अभिनेता अली फजलने (Ali Fazal) नुकताच सोशल मीडियावर सेटवरील एक खास 'बिहाइंड-द-सीन' फोटो शेअर केला आहे. या एका फोटोने चाहत्यांच्या मनातील उत्सुकता आणखी शिगेला पोहोचली आहे.
गुड्डू भैयाच्या खास सेल्फीत झळकले सचिवजी
अभिनेता अली फजलने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर 'मिर्झापूर द फिल्म'च्या सेटवरील दोन फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये शोची मूळ स्टारकास्ट एकत्र दिसत आहे. यामध्ये अली फजल (गुड्डू भैय्या), पंकज त्रिपाठी (कालीन भैय्या), दिव्येंदू (मुन्ना भैय्या), अभिषेक बॅनर्जी (कंपाउंडर) आणि शाजी चौधरी (मकबूल) हे कलाकार दिसले. विशेष म्हणजे, यावेळी चित्रपटात नव्याने जोडला गेलेला अभिनेता जितेंद्र कुमार सेल्फीत दिसल्याने सर्वांना आनंद झाला आहे. 'पंचायत'चा जितेंद्र कुमार 'मिर्झापूर' सिनेमात बबलू पंडितची भूमिका साकारत असल्याची शक्यता आहे.
हा फोटो शेअर करताना अली फजलने कॅप्शनमध्ये लिहिले, “फ्रॉम द एम टीम - ७ इकडे, १२० तिकडे. सिनेमागृहांमध्ये १२० बहादूर लागला आहे, बघून घ्या. आणि आम्ही? आमची थोडी वाट पाहा. आम्ही लवकरच तुमच्या भेटीला येत आहोत. कमिंग सून इन थिएटर्स.”
चाहत्यांचा वाढला उत्साह
या पोस्टमधून अली फजलने प्रेक्षकांना फरहान अख्तरचा '१२० बहादूर' पाहण्याचा सल्ला दिला आहे. त्याचबरोबर, त्याने 'मिर्झापूर द मूवी' लवकरच सिनेमागृहात येणार असल्याचे संकेत दिले आहेत. 'मिर्झापूर'च्या मूळ कलाकारांमध्ये जितेंद्र कुमारचा समावेश झाल्यामुळे चाहत्यांमध्ये या चित्रपटाबद्दलची उत्सुकता कमालीची वाढली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चित्रपटातील एका महत्त्वाच्या सीनसाठी मूळ कलाकार पुन्हा एकत्र आले होते. अली फजलला वाटले की, चाहत्यांनी या खास क्षणाची झलक पाहावी, म्हणूनच त्याने हे फोटो शेअर केले. 'मिर्झापूर द फिल्म' २०२६ मध्ये सिनेमागृहांमध्ये रिलीज होण्याची शक्यता आहे.