'महावतार नरसिंह'नंतर आता 'कुरुक्षेत्र', ॲनिमेटेड रुपात महाभारताची गाथा दिसणार, ट्रेलर बघाच
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2025 15:25 IST2025-10-01T15:24:53+5:302025-10-01T15:25:37+5:30
'महावतार नरसिंह' सिनेमानंतर आता कुरुक्षेत्र हा ॲनिमेटेड सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात महाभारताची भव्यदिव्य गाथा दिसणार आहे

'महावतार नरसिंह'नंतर आता 'कुरुक्षेत्र', ॲनिमेटेड रुपात महाभारताची गाथा दिसणार, ट्रेलर बघाच
काहीच दिवसांपूर्वी ॲनिमेटेड सिनेमा 'महावतार नरसिंह' चांगलाच गाजला. विष्णुचा अवतार असलेल्या नरसिंह गाथेची रोमहर्षक कहाणी रुपेरी पडद्यावर बघायला मिळाली. आता या सिनेमानंतर आणखी एक पौराणिक कथेवर आधारीत ॲनिमेटेड सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सीरिजमध्ये महाभारताची रंजक कहाणी मांडण्यात येणार आहे. या सीरिजचं नाव आहे 'कुरुक्षेत्र'. नुकतंच या सीरिजचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
'कुरुक्षेत्र' सिनेमाचा ट्रेलर
नुकतंच 'कुरुक्षेत्र' या वेबसीरिजचा ट्रेलर रिलीज झालाय. महाभारताची गाथा १८ योद्ध्यांच्या दृष्टीकोनातून पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे. या सीरिजचं वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक योद्ध्याने कुरुक्षेत्रावर युद्ध करताना घेतलेला निर्णय आणि त्यांना करावा लागलेला संघर्ष यात दाखवला आहे. सीरिजचा ट्रेलर जबरदस्त असून ॲनिमेशन थक्क करणारं आहे. या महाकाव्याच्या केंद्रस्थानी भगवान श्रीकृष्ण त्यांनी दिलेली शिकवण आणि सांगितलेलं सत्य सर्वांना अनुभवता येणार आहे.
'कुरुक्षेत्र' सीझन १ चा प्रीमियर १० ऑक्टोबरला होणार आहे. 'कुरुक्षेत्र' ही सीरिज भारतातील सर्वात मोठ्या 'धर्मयुद्धा'तील संघर्ष, वैयक्तिक शत्रुत्व दाखवणार आहे. अर्जुनाच्या (Arjuna) दुविधेपासून ते द्रौपदीच्या (Draupadi) न्यायासाठी घेतलेल्या प्रतिज्ञेपर्यंत; दुर्योधनाच्या (Duryodhan) सत्तेच्या अतृप्त लालसेपासून भीष्म पितामहच्या (Bhishma Pitamah) प्रतिज्ञेसह अनेक गोष्टी या ॲनिमेटेड सीरिजमध्ये दिसणार आहेत.
अनु सिक्का यांची ही संकल्पना आहे. तर आलोक जैन, अनु सिक्का आणि अजित अंधारे यांच्या नेतृत्वाखाली टिपिंग पॉइंटने (Tipping Point) याची निर्मिती केली आहे. उजान गांगुली यांनी या सीरिजचं लेखन आणि दिग्दर्शन केलं आहे, तर हायटेक ॲनिमेशनच्या (Hitech Animation) प्रतिभाशाली टीमने तिला जिवंत केले आहे. महान कवी गुलजार (Gulzar) यांच्या काव्यात्मक प्रतिभेने या कथेला अधिक खोली दिली आहे.