थांबा! तुम्हीही 'द फॅमिली मॅन ३'चा ८वा एपिसोड शोधत आहात? मग ही बातमी वाचा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2025 17:42 IST2025-11-24T17:41:35+5:302025-11-24T17:42:57+5:30
बॉलिवूडचा दिग्गज अभिनेता मनोज वाजपेयीची सर्वात लोकप्रिय वेबसीरीज 'द फॅमिली मॅन'चा (The Family Man 3) तिसरा सीझन ॲमेझॉन प्राईम व्हिडीओवर प्रदर्शित झाला आहे.

थांबा! तुम्हीही 'द फॅमिली मॅन ३'चा ८वा एपिसोड शोधत आहात? मग ही बातमी वाचा
बॉलिवूडचा दिग्गज अभिनेता मनोज वाजपेयीची सर्वात लोकप्रिय वेबसीरीज 'द फॅमिली मॅन'चा (The Family Man 3) तिसरा सीझन ॲमेझॉन प्राईम व्हिडीओवर प्रदर्शित झाला आहे. हा तिसरा सीझन २१ नोव्हेंबर २०२५ रोजी रिलीज करण्यात आला. रिलीज होताच या तिसऱ्या सीझनने ओटीटीवर धुमाकूळ घालायला सुरुवात केली आहे. या वेळची कथा मागील दोन्ही सीझनपेक्षा खूप वेगळी आहे. यावेळी श्रीकांत तिवारी (मनोज बाजपेयी) हा स्वतःच आपल्या डिपार्टमेंटचा 'मोस्ट वाँटेड' बनतो.
या सीझनमध्ये श्रीकांतचे कुटुंबही अडचणीत आहे. तसेच, या सीझनमध्येही त्याचा मित्र जेके तळपदे (शारिब हाश्मी) श्रीकांतची साथ सोडत नाही. या सीझनमध्ये एकूण ७ एपिसोड आहेत आणि शेवटच्या एपिसोडमध्ये कथा अशा वळणावर येते, जिथे श्रीकांत मृत्यू आणि जीवनाच्या लढाईत उभा आहे. पुढील सीझनमध्ये श्रीकांतचा मृत्यू होईल की नाही? या प्रश्नावर सोशल मीडियावर सर्वाधिक चर्चा होत आहे, पण याचदरम्यान एका 'X' अकाउंट युजरने एक पोस्ट करत मनोज वाजपेयीला विचारले की, "या सीझनचा ८ वा एपिसोड कुठे आहे?"

यावर मनोज वाजपेयीने लगेच उत्तर देत रिप्लाय केला की, "आता सर्व काही चौथ्या सीझनमध्ये... मार काट खल्लास." याचा अर्थ स्पष्ट झाला आहे की, सीझन ३ मध्ये आता कोणताही नवा एपिसोड जोडला जाणार नाही, म्हणजेच सीझन ३ मध्ये केवळ ७ एपिसोड आहेत आणि तोच शेवटचा एपिसोड आहे. त्यामुळे तुम्ही जर अजूनही 'द फॅमिली मॅन ३'च्या आठव्या एपिसोडच्या शोधात असाल, तर तुमचा शोध थांबवा; कारण यापुढे जे काही पाहायचे आहे, ते तुम्हाला सीझन ४ मध्ये पाहायला मिळेल. जयदीप अहलावतने सीझन ३ मध्ये एंट्री केली आहे आणि त्यांच्या जबरदस्त अभिनयाने या सीरिजची रंगत आणखी वाढवली आहे.
'द फॅमिली मॅन' ही एक हेरगिरी, ॲक्शन आणि थ्रिलर वेबसीरिज आहे, जी राज अँड डीके यांनी बनवली आहे. यामध्ये मनोज वाजपेयीने श्रीकांत तिवारी नावाची भूमिका साकारली आहे. या सीरिजमध्ये प्रियामणी, शरद केळकर, नीरज माधव, शारिब हाश्मी, दलिप ताहिल, सनी हिंदुजा आणि श्रेया धनवंतरी यांचाही समावेश आहे. या सीरिजची निर्मिती आणि दिग्दर्शन राज अँड डीके यांनी केले आहे, ज्यांनी सुमन कुमार आणि तुषार सेठ यांच्यासोबत कथा आणि पटकथा लिहिली आहे, तर संवाद सुमीत अरोरा आणि कुमार यांनी लिहिले आहेत.