Video: अपघाताने हात हिरावले, पण स्वप्ने नाही; रत्ना तमंगची कहाणी ऐकून जजेस झाले भावूक..!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2026 20:41 IST2026-01-06T20:40:24+5:302026-01-06T20:41:32+5:30
हुकच्या मदतीने बनवले चविष्ट नुडल्स; पाहा व्हिडिओ

Video: अपघाताने हात हिरावले, पण स्वप्ने नाही; रत्ना तमंगची कहाणी ऐकून जजेस झाले भावूक..!
लोकप्रिय कुकिंग रिअॅलिटी शो MasterChef India चा नववा सीझन सुरू झाला असून, या सीझनमधील एका प्रोमोने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. या प्रोमोमध्ये दिसणारा स्पर्धक रत्ना तमंग यांची कथा ऐकून जजेसपासून प्रेक्षकांपर्यंत सगळेच भावूक झाले. याचे कारण म्हणजे, रत्ना तमंग यांना दोन्ही हात नाहीत, तरीही त्यांनी मास्टरशेफच्या किचनमध्ये अप्रतिम नुडल्स तयार करुन जजेसना चकीत केले.
प्रोमोमध्ये नेमकं काय?
शोचा होस्ट परितोष त्रिपाठी रत्ना तमंग यांना मंचावर घेऊन येतात. त्यांच्याशी जज रणवीर बरार संवाद साधतात. या चर्चेदरम्यान रत्ना आपल्या आयुष्यातील भीषण अनुभव सांगतात. ते म्हणाले की, 2015 साली इलेक्ट्रिक शॉक लागल्याने त्यांचे दोन्ही हात गेले. शस्त्रक्रियेनंतर डॉक्टरांना जितके शक्य होते, तितकेच हात वाचवता आले.
आयुष्यातील तीन पर्याय अन् एक धाडसी निर्णय
रत्ना तमंग यांनी भावूक होत सांगितले की, अपघातानंतर त्यांच्या समोर तीन पर्याय होते. पहिला-आत्महत्या करणे, दुसरा- भीक मागून आयुष्य काढणे आणि तिसरा- हार न मानता आपल्या कलेचा उपयोग करून पुढे जाणे. रत्ना यांनी तिसरा पर्याय निवडला आणि स्वयंपाक हीच आपली ताकद बनवली.
हुकच्या मदतीने केली कुकिंग
यानंतर रत्ना तमंग आपल्या एका हातात बसवलेल्या हुकच्या सहाय्याने भाजी कापतात, पॅनमध्ये परततात आणि चविष्ट नूडल्स तयार करतात. हे सगळं पाहून जज विकास खन्ना आणि कुणाल कपूर देखील थक्क होतात.
“चव हातांत नाही, स्वप्नांत असते”
नूडल्स सर्व्ह केल्यानंतर जज रणवीर बरार भावूक होत म्हणाले, “रत्ना तमंग यांनी हे सिद्ध केले की, चव फक्त हातांत नसते, ती स्वप्नांत असते.” हा क्षण शोमधील सर्वात भावनिक क्षणांपैकी एक ठरला.
सोशल मीडियावरही कौतुकाचा वर्षाव
रत्ना तमंग आपल्या उदरनिर्वाहासाठी सोशल मीडियावर कुकिंग व्हिडीओ शेअर करत असतात. त्यांच्या कष्टांना आणि जिद्दीला मोठ्या प्रमाणात पसंती मिळते. मास्टरशेफ इंडियाचा हा प्रोमो व्हायरल होताच, सोशल मीडिया युजर्सनी रत्ना तमंग यांचे “खऱ्या आयुष्यातील फायटर” म्हणून कौतुक केले आहे.