Neena Kulkarni: ज्येष्ठ अभिनेत्री नीना कुलकर्णी यांना मानाचे विष्णुदास भावे गौरव पदक जाहीर!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2025 15:48 IST2025-10-03T15:45:44+5:302025-10-03T15:48:52+5:30
Neena Kulkarni Vishnudas Bhave Gaurav Padak: हिंदी, मराठी चित्रपटसृष्टी आणि रंगभूमीवरील आघाडीच्या अभिनेत्री नीना कुलकर्णी यांना यंदाचे मानाचे विष्णुदास भावे गौरव पदक जाहीर झाले.

Neena Kulkarni: ज्येष्ठ अभिनेत्री नीना कुलकर्णी यांना मानाचे विष्णुदास भावे गौरव पदक जाहीर!
हिंदी, मराठी चित्रपटसृष्टी आणि रंगभूमीवरील आघाडीच्या अभिनेत्री नीना कुलकर्णी यांना यंदाचे मानाचे विष्णुदास भावे गौरव पदक जाहीर झाले आहे. अखिल महाराष्ट्र नाट्य विद्या मंदिर समितीने सांगलीत शुक्रवारी पुरस्काराची घोषणा केली. रंगभूमी दिनी म्हणजे येत्या ५ नोव्हेंबररोजी सांगलीत भावे नाट्यगृहात नाट्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. जब्बार पटेल यांच्या हस्ते पदक प्रदान सोहळा संपन्न होईल.
समितीचे अध्यक्ष डॉ. शरद कराळे यांनी पुरस्काराची घोषणा केली. यावेळी समितीचे उपाध्यक्ष विलास गुप्ते, कार्यवाह बलदेव गवळी, कोषाध्यक्ष मेघाताई केळकर, सदस्य जगदीश कराळे, डॉ. भास्कर ताम्हनकर, आनंदराव पाटील, विवेक देशपांडे, बीना साखरपे, भालचंद्र चितळे, आनंदराव जाधव, व्यवस्थापक प्रकाश पाटील आदी उपस्थित होते. डॉ. कराळे म्हणाले की, रंगभूमी दिनाचे औचित्य साधून आद्य नाटककार विष्णुदास भावे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ गौरव पदक दिले जाते. नाट्यक्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या रंगकर्मीचा या पदकाने सन्मान केला जातो.
यंदाच्या ५८ व्या नीना कुलकर्णी यांचा या पदकाने सन्मान केला जाणार आहे. कुलकर्णी या गेल्या अनेक वर्षांपासून हिंदी, मराठी चित्रपट,नाट्यक्षेत्र, मालिका, नाट्य प्रशिक्षिका आदी क्षेत्रात कार्यरत आहेत. आंतरराष्ट्रीय चित्रपटसृष्टीतही योगदान दिले आहे. मुंबईत डॉक्टरांच्या कुटुंबात जन्मलेल्या आणि फ्रेंच पदवीचे शिक्षण घेतलेल्या नीना कुलकर्णी यांनी १९७० च्या दशकात मॉडेलिंगपासून करीअरची सुरुवात केली. भारतीय मुद्रित प्रसारमाध्यमातील पहिल्या क्लिअरासिल गर्ल म्हणून त्या ओळखल्या जातात. त्यांची दोन्ही अपत्ये अभिनय आणि निर्मिती क्षेत्रात आहेत.
नीना यांनी हिंदी, इंग्रजी आणि मराठी व्यावसायिक आणि प्रायोगिक नाटकांत प्रगल्भ अभिनय केला आहे. सवत माझी लाडकी चित्रपटासाठी राज्य पुरस्काराने गौरविण्यात आले. शेवरी चित्रपटाच्या निमित्ताने त्या निर्माती म्हणूनही दिसून आल्या. या बहुआयामी रंगकर्मीचा भावे गौरव पदकाने सन्मान केला जाणार आहे.