वीर पहाडिया आणि तारा सुतारियाचं अखेर ब्रेकअप? नुपूर-स्टेबिनच्या रिसेप्शनला एकटाच पोहोचला
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2026 11:23 IST2026-01-14T11:21:47+5:302026-01-14T11:23:03+5:30
बॉलिवूडमधील सर्वात चर्चेत असलेल्या जोड्यांपैकी एक म्हणजे वीर पहाडिया आणि तारा सुतारिया.

वीर पहाडिया आणि तारा सुतारियाचं अखेर ब्रेकअप? नुपूर-स्टेबिनच्या रिसेप्शनला एकटाच पोहोचला
लोकप्रिय अभिनेत्री तारा सुतारिया आणि महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांचा नातू वीर पाहाडिया हे सेलिब्रिटी कपल मागील काही दिवसांपासून सात्यत्याने चर्चेत आहेत. अलिकडेच तारा ही मुंबईमध्ये लोकप्रिय पंजाबी गायक एपी ढिल्लोंच्या कॉन्सर्टमध्ये बॉयफ्रेंड वीर पहाडियासोबत पोहोचली होती. या कॉन्सर्टमधील एक व्हिडीओ व्हायरल झाला आणि या दोघांची सगळीकडे चर्चा होऊ लागली. या कॉन्सर्टमध्ये घडल्या प्रकारानंतर वीर आणि ताराच्या नात्यामध्ये दुरावा आल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. त्यातच एका नुकत्याच घडलेल्या घटनेमुळे या ब्रेकअपच्या अफवांना अधिक बळकटी मिळाली आहे.
१३ जानेवारी रोजी मुंबईत पार पडलेल्या नुपूर सनॉन आणि स्टेबिन बेन यांच्या लग्नाच्या रिसेप्शनमध्ये वीर पहाडियाने एकट्याने हजेरी लावली. काळ्या रंगाच्या शर्ट आणि ट्राउझर्समध्ये वीर अत्यंत देखणा दिसत होता, पण त्याच्यासोबत तारा नसल्याने सर्वांच्या नजरा तिथेच खिळल्या. सहसा प्रत्येक कार्यक्रमात एकत्र दिसणारी ही जोडी यावेळी एकत्र नसल्याने त्यांच्या ब्रेकअपवर शिक्कामोर्तब झाल्याचे बोलले जात आहे.
२०२५ मध्ये केलं होतं नातं जाहीर
तारा आणि वीर यांनी २०२५ मध्ये सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आपल्या नात्याची कबुली दिली होती. विमानतळावरचे त्यांचे रोमँटिक फोटो आणि सोशल मीडियावरील एकमेकांसाठीच्या पोस्टमुळे ते नेहमीच चर्चेत असायचे. वीर आणि ताराच्या जोडीला चाहत्यांनी खूप पसंती दिली होती. मात्र, गेल्या काही काळापासून त्यांनी एकमेकांसोबतचे फोटो शेअर करणे टाळले आहे.