व्ही शांताराम यांच्या आयुष्यावरील सिनेमाची घोषणा, 'हा' बॉलिवूड अभिनेता साकारणार 'चित्रपतीं'ची भूमिका
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2025 12:00 IST2025-12-01T11:58:54+5:302025-12-01T12:00:44+5:30
चित्रपती व्ही. शांताराम यांच्यावर बायोपिक येत असून प्रसिद्ध अभिनेता व्ही. शांताराम यांची भूमिका साकारणार आहे. जाणून घ्या

व्ही शांताराम यांच्या आयुष्यावरील सिनेमाची घोषणा, 'हा' बॉलिवूड अभिनेता साकारणार 'चित्रपतीं'ची भूमिका
भारतीय सिनेसृष्टीत खऱ्या अर्थाने विविध प्रयोग राबवणारे मराठमोळे दिग्दर्शक म्हणजे व्ही. शांताराम. 'चित्रपती' अशी ओळख असलेल्या व्ही. शांताराम यांच्या आयुष्यावर आधारीत सिनेमाची घोषणा करण्यात आली आहे. या सिनेमात प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता व्ही. शांताराम यांची भूमिका साकारणार आहे. याशिवाय 'आणि.... डॉ. काशीनाथ घाणेकर' सारखा सुपरहिट मराठी सिनेमा दिग्दर्शित करणारे दिग्दर्शक अभिजीत देशपांडे या सिनेमाचं दिग्दर्शन करणार आहेत.
हा बॉलिवूड अभिनेता व्ही. शांताराम यांची भूमिका
'व्ही. शांताराम' असं या सिनेमाचं नाव असून अभिनेता सिद्धांत चतुर्वेदी सिनेमात व्ही. शांताराम यांची भूमिका साकारणार आहे. सिद्धांतचा पहिला लूक रिलीज झाला असून कॅमेरावर हात, डोक्यावर टोपी आणि जॅकेट परिधान केलेल्या व्ही. शांताराम यांच्या लूकमध्ये सिद्धांतला ओळखू येत नाही. 'गली बॉय', 'धडक २' या सिनेमांनंतर सिद्धांतचा दमदार अभिनय 'व्ही. शांताराम'च्या निमित्ताने पुन्हा एकदा चाहत्यांना दिसणार, यात शंका नाही. या सिनेमाची घोषणा झाल्यावर अनेकांनी सिद्धांतचं कौतुक केलं असून त्याला शुभेच्छा दिल्या आहेत.
व्ही. शांताराम सिनेमाविषयी
‘झनक झनक पायल बाजे’च्या नृत्यवैभवापासून ‘दो आंखें बारह हाथ’च्या सामाजिक विचारांपर्यंत, ‘अमृतमंथन’च्या तांत्रिक क्रांतीपासून ‘नागरिक’च्या वास्तववादी कथानकापर्यंत व्ही. शांताराम यांच्या प्रत्येक कलाकृतीने भारतीय चित्रपटाला नवी दिशा दिली. त्यांचे संपूर्ण आयुष्य म्हणजे संघर्ष, सर्जनशील ध्यास आणि जग बदलण्याच्या अढळ विश्वासाची उज्ज्वल परंपराच. आता त्यांचे असामान्य, प्रेरणादायी आणि वैभवशाली जीवन एका मेगा बायोपिकच्या रूपात मोठ्या पडद्यावर येत आहे. हा सिनेमा व्हिज्युअली ग्रँड, इमोशनली पॉवरफुल आणि सिनेमॅटिकली आयकॉनिक असणार आहे.
सिद्धांत चतुर्वेदी याविषयी म्हणाला, "माझ्यासाठी ही खूप मोठी जबाबदारी आणि सन्मानाची बाब आहे की मी एका अशा प्रतिष्ठित चित्रपट निर्मात्याचे आयुष्य पडद्यावर साकारत आहे, ज्यांनी येणाऱ्या पिढ्यांसाठी भारतीय सिनेमाला एका नव्या रूपात घडवले."
अभिजीत देशपांडे दिग्दर्शित, राजकमल एंटरटेनमेंट, कॅमेरा टेक फिल्म्स ॲण्ड रोअरिंग रिव्हर प्रोडक्शन प्रस्तुत या चित्रपटाचे राहुल किरण शांताराम, सुभाष काळे आणि सरिता अश्विन वर्दे निर्माते आहेत. येत्या नवीन वर्षात हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.