Urfi Javed: "वेगवेगळे कपडे घालणे म्हणजे गुन्हा नाही", उर्फी जावेद मुंबई पोलिसांसमोर हजर, कपड्यांवरून वाद
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2023 19:08 IST2023-01-14T19:07:37+5:302023-01-14T19:08:18+5:30
urfi javed photos: उर्फी जावेदने मुंबई पोलिसांसमोर जाऊन आपली बाजू मांडली आहे.

Urfi Javed: "वेगवेगळे कपडे घालणे म्हणजे गुन्हा नाही", उर्फी जावेद मुंबई पोलिसांसमोर हजर, कपड्यांवरून वाद
मुंबई : सध्या उर्फी जावेद खूप चर्चेत आहे. उर्फीच्या बोल्ड कपड्यांवरून सुरू झालेला वाद मागील काही दिवसांपासून चांगलाच गाजत आहे. आता हे प्रकरण आणखीच तापले आहे. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी उर्फीच्या कपड्यांवर आक्षेप घेत तिच्याविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली होती. यानंतर मुंबई पोलिसांकडून उर्फीला नोटीस पाठवण्यात आली होती. यासोबतच मुंबई पोलीस आयुक्तांनीही चौकशीचे आदेश दिले होते. आता उर्फीने मुंबई पोलिसांसमोर जाऊन आपली बाजू मांडली आहे.
उर्फी जावेद मुंबई पोलिसांसमोर हजर
मुंबई पोलिसांसमोर हजर होऊन उर्फीने तिची बाजू मांडताना म्हटले, "'मी एक स्वतंत्र व्यक्ती आहे. मला शूट करायला आणि वेगवेगळे कपडे घालायला आवडतात. आपल्या संविधानात हा गुन्हा नाही. जेव्हा मी अशा शूटसाठी बाहेर पडते तेव्हा माध्यमांचे प्रतिनिधी मला शोधतात, मला फॉलो करतात आणि माझे फोटो क्लिक करतात आणि ते फोटो व्हायरल होतात. मी ते व्हायरल करत नाही."
उर्फीने घेतली होती महिला आयोगात धाव
भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर उर्फी जावेदने महिला आयोगात धाव घेतली. उर्फीने देखील कठोर पाऊल उचलत चित्रा वाघ यांच्या विरोधात तक्रार दाखल केली. अलीकडेच उर्फीने महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांची भेट घेत तक्रार दाखल केली होती. आपल्या जीवाला धोका असल्याचे तिने तक्रारीत म्हटले होते.
उर्फीचे वकील म्हणतात...
उर्फी जावेदच्या वतीने तक्रार दाखल करणारे तिचे वकील नितीन सातपुते यांनी उर्फीच्या जीवाला धोका असल्याचे म्हटलं आहे. मॉडेल उर्फी जावेदला चित्रा वाघ उघडपणे धमकी देत आहेत. उर्फीच्या जीवाला धोका आहे. चित्रा वाघ आणि त्यांच्या कार्यकर्त्यांकडून उर्फी जावेदचे मॉब लिंचिंग होण्याची शक्यता आहे. ते सातत्याने उर्फीला सोशल मीडिया आणि वृत्तवाहिनीच्या माध्यमातून त्रास देत आहेत. तरीही वाघ यांच्याविरोधात कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही. उर्फी जावेदच्या जीवाचे बरे वाईट होण्याची वाट पाहत आहेत का? आम्ही महिला आयोगाला तक्रार केली आहे. उर्फी विशिष्ट समाजाची असल्याने वाघ तिला टार्गेट करत आहेत. आम्ही आमच्या परिने तक्रार केली आहे, असे ते म्हणाले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"