पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2025 10:32 IST2025-12-23T10:21:39+5:302025-12-23T10:32:04+5:30
आयुष्यातला सर्वात भीतीदायक अनुभव, मुंबईत राहणं असुरक्षित...उर्फीसोबत नक्की काय झालं? वाचा

पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
आपल्या अतरंगी फॅशनमुळे ओळखली जाणारी उर्फी जावेद चर्चेत आली आहे. सोमवारी रात्री तिच्यासोबत असं काही घडलं ज्याने ती थेट पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली. पोलिस ठाण्यात पहाटे ५ वाजताचा फोटोही तिने शेअर केला. आयुष्यातला सर्वात भयानक अनुभव असल्याचं तिने म्हटलं. नक्की काय घडलं होतं याचा खुलासा नंतर उर्फीने माध्यमाला प्रतिक्रिया देताना केला.
उर्फी जावेदने काय पोस्ट केलं?
काल उर्फी जावेदने इन्स्टाग्रामवर फोटो पोस्ट केला. यामध्ये ती आणि तिची बहीण दादाभाई नौरोजी पोलिस ठाण्यात बसलेले दिसत आहेत. तिने लिहिले,'सकाळचे ५ वाजले आहेत आणि मी पोलिस स्टेशनमध्ये आहे. आयुष्यातला सर्वात भीतीदायक अनुभव आला. मी आणि माझ्या बहिणी एक मिनिटही झोपू शकलेलो नाही. सर्वात भयानक अनुभव...मला वाटलेलं मुंबई सुरक्षित आहे.एकाच आठवड्यात मला आलेला सर्वात घाणेरडा आणि भयानक अनुभव आहे.'

नक्की काय घडलं होतं?
याबद्दल 'टाइम्स ऑफ इंडिया' प्रतिक्रिया देताना उर्फी म्हणाली, "माझ्या शेजाऱ्यांनी आमच्यासोबत गैरवर्तन केलं आहे. ही रात्री साडेतीन वाजताची घटना आहे. डॉली आणि आसफी या माझ्या बहिणींसोबत मी घरात होते. अचानक आमच्या दरवाजाची बेल वाजली. १० मिनिटं सतत कोणीतरी बेल वाजवत होतं. जेव्हा आम्ही बाहेर जाऊन पाहिलं तर तेव्हा एक व्यक्ती उभा होता जो दरवाजा उघडा म्हणत होता. तो बळजबरी आतमध्ये यायचा प्रयत्न करत होता. त्याच्यासोबत आणखी एक व्यक्ती होता जो कोपऱ्यात उभा होता. मी त्यांना निघून जायला सांगितलं पण ते जागचे हलतच नव्हते. जेव्हा मी पोलिसांना बोलवण्याची धमकी दिली तेव्हा ते तिथून निघून गेले."
ती पुढे म्हणाली, "आश्चर्य म्हणजे असं वर्तन करणारे ते लोक इमारतीतलेच रहिवासी होते. ते स्वत:ला कोणा राजकीय नेत्याच्या जवळचे असल्याचं सांगत होते. पोलिसांसमोरही त्यांचा अॅटिट्यूड कमी झाला नाही. पोलिसांसमोरही त्यांनी आम्हाला 'निकल निकल' म्हणत माज दाखवला. जेव्हा आम्ही पोलिस स्टेशनला जात होतो तेव्हा हे लोक सिक्युरिटीला सीसीटीव्ही फुटेज डिलीट करा असं सांगत होते."
उर्फीने पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. तसंच हाऊसिंग सोसायटीकडेही तक्रार केली आहे. उर्फीने एकटं राहणाऱ्या मुलींविषयी काळजी व्यक्त केली आहे.