रितेशच्या 'राजा शिवाजी'मध्ये झळकणार टीव्ही अभिनेता, 'सुख म्हणजे...' मालिकेत केलंय काम
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2025 10:23 IST2025-05-22T10:22:03+5:302025-05-22T10:23:40+5:30
'राजा शिवाजी' सिनेमा अभिषेक बच्चन, संजय दत्त, फरदीन खान, भाग्यश्री या हिंदी कलाकारांची फौज आहे. त्यातच 'सुख म्हणजे नक्की काय असतं' मालिकेतील 'या' अभिनेत्यालाही संधी मिळाली आहे.

रितेशच्या 'राजा शिवाजी'मध्ये झळकणार टीव्ही अभिनेता, 'सुख म्हणजे...' मालिकेत केलंय काम
अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) आगामी 'राजा शिवाजी' (Raja Shivaji) सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. यामध्ये तो स्वत: छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार आहे. शिवाय तोच या सिनेमाचं दिग्दर्शन करत आहे. तर जिनिलिया देशमुख आणि ज्योती देशपांडे निर्मात्या आहेत. कालच सिनेमाचं मोशन पोस्टर सोशल मीडियावर शेअर करण्यात आलं. तसंच सिनेमातील इतर स्टारकास्टही उलगडण्यात आली. दरम्यान 'सुख म्हणजे नक्की काय असतं' मालिकेतील एका अभिनेत्याचीही या सिनेमात महत्वाची भूमिका असणार आहे.
'राजा शिवाजी' सिनेमाची चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे. यासाठी एक वर्ष वाट पाहावी लागणार आहे. सिनेमा पुढील वर्षी १ मे रोजी रिलीज होणार आहे. मराठी, हिंदी, तेलुगु, तमिळ, कन्नड आणि मल्याळम अशा ६ भाषांमध्ये सिनेमा बघायला मिळणार आहे. दरम्यान 'सुख म्हणजे नक्की काय असतं' या मालिकेतून लोकप्रिय झालेला अभिनेता कपिल होनरावचीही (Kapil Honrao) या सिनेमात भूमिका आहे. त्याने सोशल मीडियावर पोस्टर शेअर करत लिहिले, "महाराष्ट्राचं आराध्य दैवत, महापराक्रमी राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराजांना सिनेमारूपी अभिवादन, सादर करत आहोत 'राजा शिवाजी'.
स्टार प्रवाहवर 'सुख म्हणजे नक्की काय असतं' मालिका खूप लोकप्रिय झाली होती. कपिल होनरावने यामध्ये मल्हारची भूमिका साकारली होती. याशिवाय त्याने काही नाटकांमध्येही काम केलं आहे. आता रितेशच्या या महत्वाच्या सिनेमात काम करण्याची त्याला संधी मिळाली आहे. यामुळे सध्या त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. 'राजा शिवाजी' सिनेमात संजय दत्त, महेश मांजरेकर, सचिन खेडेकर, फरदीन खान, अभिषेक बच्चन, जितेंद्र जोशी, भाग्यश्री अशी मुख्य स्टारकास्ट आहे. अजय-अतुल सिनेमाचं संगीत दिग्दर्शन करणार आहेत.