रंगभूमी हे अभिनेत्याचे माध्यम आहे तर चित्रपट हे दिग्दर्शकाचे माध्यम आहे : अभिनेता मनोज बाजपेयी
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2023 18:25 IST2023-11-25T18:24:40+5:302023-11-25T18:25:32+5:30
चित्रीकरण संपल्यानंतर आम्ही एखाद्या कुटुंबाप्रमाणेच एकत्र येऊन आपापल्या कल्पना, हास्य आणि जेवण यांचीही देवाण-घेवाण करत होतो.

रंगभूमी हे अभिनेत्याचे माध्यम आहे तर चित्रपट हे दिग्दर्शकाचे माध्यम आहे : अभिनेता मनोज बाजपेयी
नारायण गावस
पणजी: इफ्फीत प्रतिनिधींशी संवाद साधताना, ‘गुलमोहोर’ या चित्रपटात मुख्य भूमिका करणारे अभिनेते मनोज बाजपेयी म्हणाले की रंगभूमी हे अभिनेत्याचे माध्यम आहे तर चित्रपट हे दिग्दर्शकाचे माध्यम आहे. दिग्दर्शकाने चित्रपटाच्या सेटवर निर्माण केलेले घरगुती वातावरण ‘कुटुंब’ या विषयावर आधारित हृदयस्पर्शी चित्रपटाचे चित्रीकरण करताना एखाद्या कार्यशाळेसारखे उपयुक्त ठरले. “कुटुंब ही संकल्पना आणि त्यातील भावना चित्रीकरणाच्या पल्याड पोहोचली होती. कॅमेऱ्यासमोर आम्ही वडील, मुलगा, मुलगी, आई अशी पात्रे रंगवत होतो आणि चित्रीकरण संपल्यानंतर आम्ही एखाद्या कुटुंबाप्रमाणेच एकत्र येऊन आपापल्या कल्पना, हास्य आणि जेवण यांचीही देवाण-घेवाण करत होतो. या वातावरणाने सर्व तरुण कलाकारांना आपापल्या भूमिकेत शिरण्यास आणि त्या भूमिकेचे बारकावे समजून घेण्यास मदत केली. एक कुटुंब, त्यातील सदस्य आणि त्यांचे आपापसांतील नातेसंबंध हा चित्रपट दर्शवतो. या घरगुती वातावरणाशिवाय हे शक्य झाले नसते,” असे बाजपेयी म्हणाले.
रंगभूमीकडून चित्रपटांच्या दिशेने झालेल्या स्थित्यंतराबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मनोज बाजपेयी म्हणाले की ते सर्वप्रथम स्वतःला रंगभूमीवरील कलाकार मानतात. ‘बँडीट क्वीन’ या चित्रपटाचे दिग्दर्शक शेखर कपूर यांनी, भविष्यात रंगभूमीवरील कलाकारांना आर्थिक अडचणींमुळे ज्या समस्यांना तोंड द्यावे लागू शकेल अशा समस्या अधोरेखित केल्या आणि आपल्याला चित्रपटांचा मार्ग स्वीकारण्यासाठी प्रोत्साहन दिले, अशी आठवण त्यांनी यावेळी सांगितली , असे ते म्हणाले.
‘गुलमोहोर’ या कौटुंबिक चित्रपटामागची संकल्पना विषद करताना चित्रपटाचे दिग्दर्शक राहुल व्ही. चित्तेला यांनी सांगितले की कुटुंब आणि घर यांच्या व्याख्या काळासोबत बदलत जातात आणि आपले वय झाले की त्या बदलतात. मात्र याच दोन गोष्टी नेहमीच महत्त्वाच्या असतात. “हा चित्रपट तीन पिढ्यांच्या संदर्भात कुटुंब आणि घर यांच्या अर्थाबद्दल भाष्य करतो.