सैफ अली खानवर हल्ला करणारा अन् पकडलेला एकच; बोटांचे ठसे जुळले, अभिनेत्याची सुरक्षा वाढविली
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2025 22:15 IST2025-01-23T22:15:28+5:302025-01-23T22:15:44+5:30
Saif Ali Khan: सैफच्या घरातून पोलिसांनी घेतलेले बोटांचे ठसे हे अटक केलेल्या बांगलादेशी मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजादच्या हाताच्या बोटांच्या ठशांशी जुळले आहेत.

सैफ अली खानवर हल्ला करणारा अन् पकडलेला एकच; बोटांचे ठसे जुळले, अभिनेत्याची सुरक्षा वाढविली
बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानच्या घरात घुसून त्याच्यावर हल्ला करणारा आणि मुंबई पोलिसांनी पकडलेला आरोपी एकच असल्याचे स्पष्ट झाले आहे. सीसीटीव्हीत दिसणारा आणि पोलिसांनी पकडलेला आरोपी एकच नसल्याचे सोशल मीडिया आणि फॉरेन्सिक लॅबच्या आधारे दावे करण्यात येत होते.
सैफच्या घरातून पोलिसांनी घेतलेले बोटांचे ठसे हे अटक केलेल्या बांगलादेशी मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजादच्या हाताच्या बोटांच्या ठशांशी जुळले आहेत. सैफचा मुलगा जहांगीरच्या खोलीतून, दरवाजाच्या हँडलवरून, बाथरूमचे दरवाजे आणि पायऱ्यांच्या रेलिंगवरून शहजादच्या बोटांचे ठसे गुन्हे शाखेने घेतले होते. ते जुळतात का हे पाहण्यासाठी ते फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठविण्यात आले होते.
दरम्यान, मुंबई पोलिसांनी सैफच्या सुरक्षेत वाढ केली आहे. घराबाहेर दोन शिफ्टमध्ये दोन कॉन्स्टेबल तैनात केले आहेत. तात्पुरती पोलिस सुरक्षा पुरवली असल्याचे मुंबई पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. वांद्रे पोलिस ठाण्यातील दोन हवालदार तेथे दोन शिफ्टमध्ये तैनात असणार आहेत. सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे आणि खिडकीच्या ग्रिल देखील बसवण्यात आल्या आहेत, असे पोलिसांनी सांगितले.
शहजाद याची उद्या पोलीस कोठडी संपत आहे, त्याला न्यायालयात हजर करून पोलीस कोठडी वाढविण्याची मागणी केली जाणार आहे. शहजाद सैफच्या इमारतीत कसा घुसला, सैफच्या घरात काय घडले याचा सीन पुन्हा तयार केला जात आहे. तो बांगलादेशी आहे हे देखील आता स्पष्ट झाले आहे. मागील सुनावणीवेळी आरोपीच्या वकिलांनी तो बांगलादेशी नसल्याचा दावा केला होता. आता त्याच्या वडिलांनीच तो आपला मुलगा असल्याचे सांगत काही महिन्यांपूर्वी तो भारतात गेल्याचे म्हटले आहे.
सैफवर हल्ला करताना मोडलेला चाकू देखील पोलिसांनी तलावाच्या परिसरातून ताब्यात घेतला आहे. एक तुकडा सैफच्या पाठीत घुसला होता. तो सहा तासांच्या शस्त्रक्रियेनंतर काढण्यात आला आहे. लिलावती हॉस्पिटलमध्ये ही शस्त्रक्रिया झाली आहे. आता सैफ एवढ्या भीषण हल्ल्यानंतर आरामात चालत कसा आला यावरून भाजपाचे नितेश राणे आणि शिवसेनेचे संजय निरुपम यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.