थँक यू डॉक्टर, मला डिस्चार्ज कधी मिळणार? सैफ अली खानचा डॉक्टरांबरोबर पहिला संवाद
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2025 06:55 IST2025-01-18T06:50:37+5:302025-01-18T06:55:01+5:30
Saif Ali Khan : सैफच्या पाठीवर शस्त्रक्रिया करणारे डॉ. डांगे यांनी सांगितले की, सध्या सैफची प्रकृती उत्तम आहे.

थँक यू डॉक्टर, मला डिस्चार्ज कधी मिळणार? सैफ अली खानचा डॉक्टरांबरोबर पहिला संवाद
मुंबई : घरफोडीच्या उद्देशाने घरात शिरलेल्या चोराच्या हल्ल्यात जखमी झालेल्या अभिनेता सैफ अली खान याने त्याच्यावर उपचार करणाऱ्या सर्व डॉक्टरांचे आभार मानले. तसेच डिस्चार्ज कधी मिळणार, अशी विचारणा केली.
सैफच्या मणक्यातील चाकूचा तुकडा काढणारे न्यूरो सर्जन डॉ. नितीन डांगे यांनी या संदर्भात माहिती देताना सांगितले की, शुक्रवारी डॉक्टरांच्या पथकाने सैफची भेट घेतली. त्यावेळी त्याने सर्वांचे आभार मानले. पाठीच्या मणक्यात खोलवर इजा झाल्याने डॉक्टरांनी गुरुवारी सैफवर शस्त्रक्रिया केली. मानेच्या उजव्या भागावर, डाव्या हाताच्या मनगटावर शस्त्रक्रिया करण्यात आली.
शुक्रवारी डॉक्टरांनी तपासणी केली. हात आणि मानेच्या जखमेपेक्षा पाठीच्या जखमेची डॉक्टर सध्या जास्त काळजी घेत आहेत. शुक्रवारी सकाळी त्याला चालवून बघितले. त्यावेळी तो व्यवस्थित चालला. जखमही चांगली बरी असल्याने डॉक्टरांनी त्याला अतिदक्षता विभागातून स्पेशल रूममध्ये हलविले.
सोमवारपर्यंत डिस्चार्ज
सैफच्या पाठीवर शस्त्रक्रिया करणारे डॉ. डांगे यांनी सांगितले की, सध्या सैफची प्रकृती उत्तम आहे.
त्याने डिस्चार्जबद्दल विचारले असता आम्ही त्याला, ‘दोन-तीन दिवस तब्येत कशी हे पाहून सोमवारपर्यंत डिस्चार्ज देऊ,’ असे सांगितले.
उपचारांना चांगला प्रतिसाद मिळाला आहे. मणक्याची जखम असल्यामुळे २ आठवडे चालण्यावर थोडे निर्बंध आणले पाहिजेत, असेही त्याला सांगितले. तसेच बेड रेस्टचा सल्लाही देण्यात आला आहे.
- सैफ रुग्णालयात आला, त्यावेळी सोबत धाकटा मुलगा तैमूर होता. रक्तबंबाळ अवस्थेत असलेला सैफ खरेच रिअल लाइफ हीरो आहे. इतक्या गंभीर जखमा असतानाही तो स्वतः चालत आला. कुणाचीही मदत न घेता अतितत्कळ विभागात पोहोचला. डॉक्टरांनी केलेल्या प्रयत्नांमुळे त्याच्यावर चांगले उपचार झाले.
सैफ सिंहासारखा रुग्णालयात दाखल झाला
वरिष्ठ डॉक्टरांपैकी रुग्णालयात त्याला भेटणारा पहिला डॉक्टर मी होतो. रक्तबंबाळ होऊन तो सिंहासारखा रुग्णालयात दाखल झाला. त्याच अवस्थेत तो स्वतः चालत आला. त्याने कुठलंही स्ट्रेचर किंवा व्हीलचेअर घेतले नाही. त्याच्यासोबत त्याचा मुलगा तैमूर होता.
डॉ. नीरज उत्तमानी, मुख्य कार्यकारी अधिकारी, लीलावती रुग्णालय