'येऊ कशी तशी मी नांदायला'मधील ओम उर्फ शाल्व किंजवडेकर लवकरच बांधणार लग्नगाठ!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2023 19:07 IST2023-02-11T19:07:14+5:302023-02-11T19:07:30+5:30
शाल्वला खऱ्या आयुष्यात स्वीटू भेटली आहे आणि लवकरच तो लग्नबेडीत अडकणार आहे.

'येऊ कशी तशी मी नांदायला'मधील ओम उर्फ शाल्व किंजवडेकर लवकरच बांधणार लग्नगाठ!
झी मराठी वाहिनीवरील ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ ही मालिका लोकप्रिय होती. या मालिकेतील ओम व स्वीटूच्या जोडी प्रेक्षकांना खूपच भावली होती. या मालिकेत अभिनेता शाल्व किंजवडेकरने ओमची भूमिका साकारली होती. शाल्वला खऱ्या आयुष्यात स्वीटू भेटली आहे आणि लवकरच तो लग्नबेडीत अडकणार आहे.
अभिनेता शाल्व किंजवडेकर गर्लफ्रेंड श्रेया डाफळापूरकरसोबत विवाह बंधनात अडकणार आहे. शाल्व आणि श्रेयाच्या घरी सध्या लगीनघाई सुरू आहे. नुकताच श्रेयाचा मेहेंदी सेरेमनी पार पडला. शाल्व आणि श्रेयाच्या मेहेंदी सोहळ्यातील फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. मेहंदी सोहळ्यासाठी दोघांंनी पिवळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला होता.
शाल्वने पिवळ्या रंगाचा कुर्ता पायजमा परिधान केला होता. तर पिवळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये श्रेयाचे सौंदर्य खुलून आले होते. शाल्व आणि श्रेयाच्या मेहेंदी सेरेमनीला अभिनेता सिद्धार्थ चांदेकरनेही हजेरी लावली होती.
शाल्व आणि श्रेया गेल्या अनेक वर्षांपासून रिलेशनशीपमध्ये आहेत. श्रेया ही एक स्टायलिस्ट आहे. शाल्वने मालिकांबरोबरच चित्रपटातही काम केले आहे. शाल्व व श्रेया सोशल मीडियावरुन एकमेकांबरोबरचे फोटो शेअर करत प्रेम व्यक्त करताना दिसतात.
त्यांच्या फोटोंना चाहत्यांची पसंतीदेखील मिळताना दिसते.