अभिनेत्रींपेक्षा अभिनेत्यांना का जास्त मिळतं मानधन?, एकता कपूरने सांगितलं कारण
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2025 13:22 IST2025-07-21T13:22:17+5:302025-07-21T13:22:48+5:30
Ekta Kapoor : चित्रपटांपासून ते टीव्हीपर्यंत, अनेक अभिनेत्रींना त्यांना मानधन कमी मिळत असल्याची तक्रार केली आहे. मात्र आता निर्माती एकता कपूरने हे दावे फेटाळून लावले आहेत.

अभिनेत्रींपेक्षा अभिनेत्यांना का जास्त मिळतं मानधन?, एकता कपूरने सांगितलं कारण
चित्रपटांपासून ते टीव्हीपर्यंत, अनेक अभिनेत्रींना त्यांना मानधन कमी मिळत असल्याची तक्रार केली आहे. अनेक नायिकांनी असा दावा केला आहे की अभिनेत्रींचे मानधन अभिनेत्यांपेक्षा अनेक पटीने कमी आहे. आता निर्माती एकता कपूर(Ekta Kapoor)ने हे दावे फेटाळून लावले आहेत. एकता म्हणते की, किमान टीव्हीमध्ये कोणत्याही अभिनेत्रीला अभिनेत्यांपेक्षा कमी मानधन दिले जात नाही. जरी असे घडले तरी त्याचे एक विशेष कारण आहे.
फाय डिसूझा यांच्याशी अलीकडेच झालेल्या मुलाखतीत, एकता कपूरने इंडस्ट्रीमधील लिंगभेदावर तिचे मत मांडले. मानधन तफावतेबद्दल ती म्हणाली की, ''मला वाटत नाही की हा लिंगभेदाचा मुद्दा आहे. मी हे आधीही सांगितले आहे आणि कदाचित यासाठी माझ्यावर टीका होईल. पण गोष्ट अशी आहे की टेलिव्हिजनमध्ये महिलांना खूप जास्त मानधन दिले जाते, खूप जास्त.''
अभिनेत्यांना अभिनेत्रींपेक्षा जास्त मानधन कधी मिळते?
एकता कपूर पुढे म्हणाली, ''टेलिव्हिजन हे एकमेव माध्यम आहे जिथे लेखक आणि महिला दोघांनाही चांगले मानधन दिले जाते. असे दोन गट आहेत ज्यांना सामान्यतः मानधन दिले जात नाही. पण टेलिव्हिजनमध्ये महिलांना पुरुषांपेक्षा खूप जास्त मानधन दिले जाते. मी तुम्हाला सांगते, कोणत्याही मालिकेत कोणत्याही माध्यमात कोणत्याही महिलेला पुरुषांपेक्षा कमी मानधन दिले जात नाही. जोपर्यंत तो पुरूष अनेक वर्षांपासून काम करत नाही. पण जर तुम्ही खऱ्या संख्येने मोजले तर, महिलेने किती काळ काम केले आहे या आधारावर, महिला जास्त कमावतील.''
''हे माध्यम फक्त महिला चालवतात...''
एकता कपूर सध्या स्मृती ईराणींच्या 'क्योंकी सास भी कभी बहू थी २' या मालिकेसाठी चर्चेत आहे. दरम्यान, ती टीव्हीबद्दल म्हणते की, 'हे महिलांचे वर्चस्व असलेले माध्यम आहे. हे माध्यम फक्त महिला चालवतात. प्रकरण मूलभूत गोष्टींवर संपते. तुम्ही महिलांबद्दल कथा सांगता, महिला त्या पाहतात, बिझनेस होतो आणि महिलांना पैसे मिळतात. ही एक सायकल आहे.'