"सोहम माझा मित्र...", मंजिरीच्या खऱ्या आयुष्यातील होणाऱ्या नवऱ्याला 'राया'ने दिला सल्ला
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2025 13:40 IST2025-11-25T13:40:07+5:302025-11-25T13:40:55+5:30
मंजिरीचा खऱ्या आयुष्यातला 'राया' सोहम बांदेकरला विशाल निकम म्हणाला...

"सोहम माझा मित्र...", मंजिरीच्या खऱ्या आयुष्यातील होणाऱ्या नवऱ्याला 'राया'ने दिला सल्ला
आदेश बांदेकरांचा मुलगा सोहम बांदेकर लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. अभिनेत्री पूजा बिरारीसोबत तो लग्नगाठ बांधणार आहे. पूजा सध्या 'येड लागलं प्रेमाचं' मालिकेत मंजिरीच्या भूमिकेत दिसत आहे. मालिकेतही तिच्या आणि रायाच्या लग्नाची लगबग सुरु आहे. तर खऱ्या आयुष्यातही मंजिरी म्हणजेच पूजाची लग्नाची तयारी सुरु आहे. दरम्यान रायाने मंजिरीच्या खऱ्या आयुष्यातील होणाऱ्या नवऱ्याला एक सल्ला दिला आहे. नक्की काय म्हणाला विशाल निकम?
विशाल निकम म्हणाला, "दोघांना मी हेच सांगेन की एकमेकांना नेहमी समजून घ्या. प्रेमाने राहा. सोहमला एकच सांगेन की तुला जास्त समजून घ्यावं लागणार आहे. मुलींना समजून घेणं हे काही सोपं नाही. कारण त्या तशा बनल्याच आहेत. त्यामुळे त्यांच्यात बदल करायला जायचं नाही. मुलांनीच स्वत:मध्ये बदल करायचे असतात. तरच सगळ्या गोष्टी व्यवस्थित होऊ शकतात. मी या सगळ्या भावना समजू शकतो आणि मी ते माझ्या आयुष्यात अनुभवतही आहे. सोहम आणि पूजा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. मुळात पूजा खूप समजूतदार आहे. सोहमही माझा मित्र आहे. त्यांना सल्ल्याची काही गरज नाहीये."
पुढे पूजाला 'तू कधी लग्न करतेय?' असं विचारल्यावर ती म्हणाली, 'आता लवकरच आहे..तुम्हाला कळेलच'. पूजा मूळची पुण्याची आहे. ती पहिल्यांदा 'साजणा' या मराठी मालिकेत दिसली होती. झी युवा वाहिनीवर ही मालिका प्रसारित झाली होती. यानंतर ती 'स्वाभिमान: शोध अस्तित्वाचा' या लोकप्रिय मालिकेमुळे घराघरात पोहोचली. यात तिची पल्लवी ही भूमिका होती. तर आता 'येड लागलं प्रेमाचं' मालिकेतून पूजा प्रेक्षकांचं मन जिंकत आहे. तर सोहम बांदेकर 'ठरलं तर मग'मालिकेचा निर्माता आहे. बांदेकर प्रोडक्शन्सचं काम तो बघत आहे.