ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचं छोट्या पडद्यावर पुनरागमन, या मालिकेत होणार लवकरच एंट्री
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2022 18:46 IST2022-10-10T15:16:50+5:302022-10-10T18:46:29+5:30
विक्रम गोखले यांनी लोकप्रिय मालिका अग्निहोत्रमध्ये साकारलेले मोरेश्वर अग्निहोत्रीची भूमिका आजही प्रेक्षकांच्या मनात घर करुन आहे.

ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचं छोट्या पडद्यावर पुनरागमन, या मालिकेत होणार लवकरच एंट्री
स्टार प्रवाहवरील तुझेच मी गीत गात आहे मालिकेत मल्हार कामत आणि स्वराजचा सांगीतिक प्रवास प्रेक्षक अनुभवतच आहेत. लवकरच मालिकेत ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांची एण्ट्री होणार आहे. मल्हारने आपल्या गाण्याचं शिक्षण ज्यांच्याकडून घेतलं ते त्याचे गुरु यांची व्यक्तिरेखा विक्रम गोखले साकारणार आहेत. बऱ्याच वर्षांनंतर विक्रमजी तुझेच मी गीत गात आहे मालिकेच्या निमित्ताने छोट्या पडद्यावर पुनरागमन करणार आहेत.
स्टार प्रवाहची लोकप्रिय मालिका अग्निहोत्रमध्ये विक्रम गोखले यांनी साकारलेले मोरेश्वर अग्निहोत्री आजही प्रेक्षकांच्या मनात घर करुन आहेत. तुझेच मी गीत गात आहे मालिकेतली ही व्यक्तिरेखा साकारण्यासाठी ते अतिशय उत्सुक आहेत. मालिका लोकप्रिय तर आहेच त्यासोबतच नव्या पीढीसोबत काम करताना नेहमीच आनंद होतो अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
मालिकेत मल्हार कामत सध्या द्विधा मनस्थितीमध्ये आहे. एकीकडे वैदेहीच्या आठवणी तर दुसरीकडे लेकीचा शोध सुरु असताना पंडितचींच्या येण्याने मल्हारच्या आयुष्यात नेमकं कोणतं वळण येणार? स्वराच आपली मुलगी आहे का हे सत्य मल्हारसमोर उघड होणार का? हे पहाणं उत्सुकतेचं असेल.