वीणा जगतापची 'ठिपक्यांची रांगोळी' मालिकेत एन्ट्री, म्हणते - 'अवंतिका अगदी माझ्यासारखी..'
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2022 17:04 IST2022-06-24T17:04:09+5:302022-06-24T17:04:46+5:30
Tipkyanchi Rangoli: ‘ठिपक्यांची रांगोळी’ मालिकेला प्रेक्षकांचं भरभरुन प्रेम मिळत आहे. कानेटकर कुटुंब प्रेक्षकांच्या कुटुंबाचाच एक भाग झाला आहे.

वीणा जगतापची 'ठिपक्यांची रांगोळी' मालिकेत एन्ट्री, म्हणते - 'अवंतिका अगदी माझ्यासारखी..'
स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘ठिपक्यांची रांगोळी’ (Tipkyanchi Rangoli) मालिकेला प्रेक्षकांचं भरभरुन प्रेम मिळत आहे. कानेटकर कुटुंब प्रेक्षकांच्या कुटुंबाचाच एक भाग झाला आहे. लवकरच या कुटुंबात नव्या सदस्याची एण्ट्री होणार आहे. या नव्या सदस्याचं नाव आहे अवंतिका कानेटकर चौधरी. अवंतिका ही विनायक कानेटकर यांची मुलगी. प्रेमविवाह केला म्हणून तिला कुटुंबापासून कायमचं दूर करण्यात आले. इतक्या वर्षांनंतर पुन्हा अवंतिका कानेटकर कुटुंबात दाखल होणार आहे. अवंतिकाच्या येण्याचं नेमकं कारण काय याची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे. अवंतिकाची भूमिका मराठी टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेत्री वीणा जगताप (Veena Jagtap) साकारताना दिसणार आहे.
सुप्रसिद्ध अभिनेत्री वीणा जगताप अवंतिकाची भूमिका साकारत असून हे पात्र साकारण्यासाठी ती अतिशय उत्सुक आहे. स्टार प्रवाहसोबतची तिची ही पहिलीच मालिका. मात्र पहिल्याच दिवशी सेटवर तिची सर्वांसोबतच छान मैत्री झालीय. कानेटकर कुटुंबाची मी चाहती होतेच; या कुटुंबाचा भाग होताना अतिशय आनंद होतोय अशी भावना वीणाने व्यक्त केली.
अवंतिका या व्यक्तिरेखेबद्दल सांगताना ती म्हणाली, अवंतिका आर्थिक सल्लागार आहे. उच्चशिक्षित असली तरी आपल्या रितीपरंपरा जपणारी. अवंतिका हे पात्र माझ्या स्वभावाच्या अगदी मिळतं जुळतं आहे असं मला वाटतं. जे असेल ते समोरासमोर बोलून मोकळी होणारी अशी अवंतिका साकारण्यासाठी मी खूपच उत्सुक आहे.