स्वानंदी–समर आणि आधिरा–रोहनने बाप्पाच्या चरणी ठेवली लग्नपत्रिका, पार पडलं पारंपारिक केळवण
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2025 16:38 IST2025-11-04T16:37:51+5:302025-11-04T16:38:52+5:30
Veen Doghatali Hi Tutena Serial : 'वीण दोघातली ही तुटेना'मध्ये सध्या महालग्नसोहळ्याचे वातावरण आहे. मालिकेतील प्रिय जोडपी स्वानंदी-समर आणि आधिरा-रोहन यांच्या विवाह सोहळ्याची सुरुवात झाली असून, हा प्रसंग सरपोतदार आणि राजवाडे या दोन्ही कुटुंबांना एकत्र आणणार आहे.

स्वानंदी–समर आणि आधिरा–रोहनने बाप्पाच्या चरणी ठेवली लग्नपत्रिका, पार पडलं पारंपारिक केळवण
झी मराठीवरील प्रेक्षकांची लाडकी मालिका 'वीण दोघातली ही तुटेना'मध्ये सध्या महालग्नसोहळ्याचे वातावरण आहे. मालिकेतील प्रिय जोडपी स्वानंदी-समर आणि आधिरा-रोहन यांच्या विवाह सोहळ्याची सुरुवात झाली असून, हा प्रसंग सरपोतदार आणि राजवाडे या दोन्ही कुटुंबांना एकत्र आणणार आहे. या विशेष प्रसंगाची सुरुवात करताना, वधू-वरांनी सर्वप्रथम गणपती मंदिराला भेट दिली. बाप्पांसमोर लग्नपत्रिका ठेऊन सर्व सोहळे निर्विघ्न पार पडावेत यासाठी त्यांनी प्रार्थना केली. यावेळी गुलाबपुष्पांच्या वर्षावात या दोन्ही जोडप्यांचे मंदिरात स्वागत करण्यात आले.
मंदिरातून ही दोन जोडपी थेट 'माजघरात' पोहोचली, जिथे त्यांचे स्वागत करण्यासाठी कमळी, भावना, जान्हवी, मीरा आणि नर्मदा आत्या उत्सुकतेने वाट पाहत होत्या. स्वानंदी-समर आणि आधिरा-रोहन यांच्या केळवण सोहळ्यासाठी या सर्वांनी पारंपरिक पद्धतीने ओवाळून त्यांचे स्वागत केले. या जोडप्यांसाठी खास तयार करण्यात आलेले एक सुंदर गाणं या ठिकाणी सादर करण्यात आले, ज्यामुळे वातावरण अधिक आनंदमय झाले. राजवाडे आणि सरपोतदार कुटुंबातील सर्व सदस्य या आनंदोत्सवात सहभागी झाले होते. या सर्वांना प्रतीक्षा होती ती महाराष्ट्रीयन थाळीची! स्वादिष्ट डाळिंबी उसळ, कोथिंबीर वडी, सोलकढी आणि इतर रुचकर पदार्थांनी सजलेली थाळी पाहून सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. वधू-वरांनी एकमेकांना घास भरवून उखाणेही घेतले.
कलाकारांचा खास अनुभव
या प्रसंगी कलाकारांनी सांगितले की, ''हा महाविवाह सोहळा आमच्यासाठी खूप खास आहे. इतक्या दिवसांच्या प्रवासानंतर मालिकेतील दोन्ही जोडप्यांचे लग्न होताना पाहून आम्हालाही खूप आनंद होत आहे.'' पुढे ते म्हणाले, "केळवणासाठी आम्ही आमचे संध्याकाळचे स्नॅक्स स्किप केलं, कारण ‘माजघर’ बद्दल खूप ऐकलं होतं आणि तिथे आमचे केळवण असल्यामुळे उत्सुकता अधिकच वाढली होती. संध्याकाळी जेवण खरोखरच अपेक्षेपेक्षा अधिक सुंदर अनुभव देणारे ठरले. प्रत्येक पदार्थ अतिशय स्वादिष्ट होता, फुलांनी सजवलेला व्हेन्यू आणि केळीच्या पानावर लिहिलेली आमची नाव पाहून आम्हाला खूप विशेष वाटले. सर्वात मोठा सरप्राईज म्हणजे आमच्यासाठी खास तयार केलेले गाणं. प्रेक्षकांनी वीण  दोघातली ही  तुटेना या मालिकेवर असच प्रेम आणि आशीर्वाद कायम ठेवावा, हीच आमची इच्छा आहे." 
मराठी टीव्हीवर प्रथमच 'बीच वेडिंग'
प्रेक्षकांसाठी हा महाविवाह सोहळा एक मोठी पर्वणी ठरणार आहे. विशेष म्हणजे, या मालिकेद्वारे मराठी टेलिव्हिजनवर पहिल्यांदाच डेस्टिनेशन बीच वेडिंग पाहायला मिळणार आहे. कलाकारांनी प्रेक्षकांना ‘वीण दोघातली ही तुटेना’ या मालिकेवर असंच प्रेम आणि आशीर्वाद कायम ठेवण्याची इच्छा व्यक्त केली.