"वडिलांनी सोडलं, आई विष देऊन मारणार होती" अभिनेत्रीची धक्कादायक खुलासा; म्हणाली...
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2026 12:51 IST2026-02-27T12:51:10+5:302026-02-27T12:51:25+5:30
लोकप्रिय अभिनेत्रीचं बालपण प्रचंड संघर्षात गेलं आहे.

"वडिलांनी सोडलं, आई विष देऊन मारणार होती" अभिनेत्रीची धक्कादायक खुलासा; म्हणाली...
लोकप्रिय मालिका 'शक्तीमान' आजही कोणाला आठवत नाही असं होणार नाही. या मालिकेत निर्भय पत्रकार 'गीता विश्वास'ची भूमिका साकारणारी अभिनेत्री वैष्णवी हिने घराघरात आपली ओळख निर्माण केली. मात्र, पडद्यावर नेहमी हसणारी आणि धाडसी दिसणाऱ्या या अभिनेत्रीचे वैयक्तिक आयुष्य प्रचंड संघर्षाने आणि वेदनांनी भरलेले होतं. इतकंच नाही तर एक वेळ तर अशी आली होती की वैष्णवीच्या आईने तिचा आणि तिच्या बहिणीचा खून करून आत्महत्या करण्याचाही विचार केला होता.
वैष्णवीच्या संघर्षाची कहाणी तिच्या बालपणापासूनच सुरू झाली. एकेदिवशी तिचे वडील कोणालाही काहीही न सांगता, कोणतेही स्पष्टीकरण न देता अचानक 'बेपत्ता' झाले. पैशांची चणचण होती, त्यामुळे वडिलांना शोधण्यासाठी पैसे उधार घेऊन वैष्णवीची आई आणि धाकट्या बहिणी मुंबईत आले. ते एका लॉजमध्ये राहिले आणि त्यांच्या वडिलांचा शोध घेऊ लागले. भाडे आणि जेवणासाठी पैसे नसल्याने हतबल झालेल्या तिच्या आईने एक टोकाचा निर्णय घेतला. वैष्णवीने सांगितले की, "आम्ही चुकीच्या हातात पडू नये म्हणून आईने आम्हाला मारून स्वतः आत्महत्या करण्याचा विचार केला होता. ती आमच्या जेवणात विष मिसळणार होती".
मात्र, एका चर्चमध्ये मिळालेल्या आध्यात्मिक अनुभवाने त्यांचे जीवन कायमचे बदलले. ती म्हणाली, "मला तिथे एक अलौकिक अनुभव आला. मला देवाची शक्ती जाणवली आणि मी रडू लागले. जेव्हा लॉजवर परतले तेव्हा दाराबाहेर नवीन 100 रुपयांच्या नोटांचे एक बंडल सापडले, लॉजचे बिल भरण्यासाठी आवश्यक तितकी रक्कम होती. तेव्हापासून मी देवावर विश्वास ठेवू लागले. दोन आठवड्यांतच आम्ही एका पूर्णपणे सुसज्ज वन बीएचके फ्लॅटमध्ये राहायला गेलो. हा एक चमत्कार होता".
बॉलिवूडमध्ये एन्ट्री
वैष्णवीने १९८८ मध्ये 'वीराना' या हॉरर चित्रपटातून बाल कलाकार म्हणून पदार्पण केले. मात्र, या चित्रपटानंतर तिला विचित्र अनुभव येऊ लागले. त्यानंतर तिने बॉलिवूडमध्ये स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न केला, पण नशिबाने साथ दिली नाही. अनेक चित्रपट तिच्या हातातून गेले, तर काहींमधून तिला विनाकारण काढून टाकण्यात आले. अखेर कंटाळून तिने अखेर चित्रपटसृष्टी सोडण्याचा निर्णय घेतला.
'गीता विश्वास'ने पालटले नशीब
चित्रपटसृष्टीत यश न मिळाल्याने वैष्णवी टीव्हीकडे वळली. तिची आई सुरुवातीला या निर्णयावर नाराज होती, पण १९९७ मध्ये मिळालेल्या 'शक्तीमान' मालिकेतील 'गीता विश्वास' या भूमिकेने इतिहास घडवला. जवळपास ८ वर्षे चाललेल्या या मालिकेने वैष्णवीला ९० च्या दशकातील 'टेलिव्हिजन आयकॉन' बनवले. त्यानंतर तिने 'मिले जब हम तुम', 'सपने सुहाणे लडकपन के' आणि 'परिणीती' सारख्या अनेक यशस्वी मालिकांमध्ये काम केले.