"सण आपले, जबाबदारी पण आपलीच"; गणेश विसर्जनानंतर स्वच्छता मोहिम, उत्कर्ष शिंदे म्हणाला...
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2025 12:40 IST2025-09-08T12:39:40+5:302025-09-08T12:40:57+5:30
उत्कर्ष शिंदेने आपल्या सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिली.

"सण आपले, जबाबदारी पण आपलीच"; गणेश विसर्जनानंतर स्वच्छता मोहिम, उत्कर्ष शिंदे म्हणाला...
Utkarsh Shinde: गणेशोत्सव हा महाराष्ट्रात अत्यंत श्रद्धा, भक्ती आणि उत्साहात साजरा केला जातो. विशेषतः अनंत चतुर्दशीच्या दिवशी मोठ्या प्रमाणावर गणेशमूर्तींचं विसर्जन जूहू, गिरगाव आणि वर्सोवा या प्रमुख समुद्रकिनाऱ्यांवर केलं जातं. या विसर्जनामुळे समुद्रकिनाऱ्यांवर मूर्तींचे अवशेष, निर्माल्य, फुलं, हार व इतर पूजासाहित्य साचून मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण होतो. याची दखल घेत 'रजनी फाऊंडेशन इंडिया' या संस्थेने जुहू चौपाटीवर स्वच्छता मोहीम राबवली. ज्यात प्रसिद्ध गायक उत्कर्ष शिंदेनेही (Utkarsh Shinde) सहभागी होऊन स्वच्छतेचा संदेश दिला आणि स्वयंसेवकाचा उत्साह वाढवला.
उत्कर्षने या मोहिमेत सहभागी झाल्यानंतर, सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून पर्यावरणाचे रक्षण करण्याचे आवाहन केले आहे. त्यात तो म्हणतो, "सण आपले तर जबाबदारी पण आपलीच... आजच्या पढीने येणाऱ्या पिढ्यांना दूषित वातावरण, उध्वस्त केलेले किनारे, समतोल नसलेला निसर्ग द्यायचा आहे की सोबतीने एकत्र येऊन मोकळा श्वास, नयनरम्य निसर्ग, सुंदर परिसर, सुदृढ आयुष द्यायचं? याचा विचार करायलाच हवा. आपण संस्कृती ही जपूया,आणि आपल पर्यावरण देखील.आज लढू या उद्याच्या भवितव्यासाठी", या शब्दात उत्कर्षने लोकांना पर्यावरण संरक्षणाचे महत्त्व समजावून सांगितले. तसेच आपल्या संस्कृतीचा भाग असलेले सण साजरे करताना पर्यावरणाचे भान राखणे किती गरजेचे आहे, हे त्याने स्पष्ट केलंय.
उत्कर्ष शिंदेची गायक, संगीतकार व अभिनेता म्हणून ओळख आहे. शिंदे शाही घराण्याचा वारसा लाभलेल्या उत्कर्षने आजवर आपल्या गाण्यामुळे, अभिनयामुळे व त्याच्या खास लेखनशैलीने सर्वांच्याच मनात स्थान निर्माण केलं आहे. उत्कर्ष हा सोशल मीडियावर चांगलाच सक्रिय असतो. त्याचे अनेक फोटो व कामाबद्दलची माहिती तो सोशल मीडियाद्वारे चाहत्यांबरोबर शेअर करत असतो. त्याने 'बिग बॉस मराठी'मध्ये सुद्धा प्रेक्षकांची मन जिंकून घेतली होती. उत्कर्ष पेशाने डॉक्टर आहे. आपलं हॉस्पिटल, पेशंट, सामाजिक कार्यही तो सांभाळतो.