विनामेकअप मालिकेचं शूटिंग करण्याचं धाडस केलंय उर्मिला कोठारेनं, अभिनेत्रीनं स्वीकारलंय नवं आव्हान
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2022 17:31 IST2022-04-19T16:56:37+5:302022-04-19T17:31:58+5:30
अभिनेत्री उर्मिला कोठारेला याआधी आपण ग्लॅमरस रुपात पाहिलं आहे. मात्र या मालिकेत ती नो मेकअप लूकमध्ये दिसणार आहे.

विनामेकअप मालिकेचं शूटिंग करण्याचं धाडस केलंय उर्मिला कोठारेनं, अभिनेत्रीनं स्वीकारलंय नवं आव्हान
स्टार प्रवाहवर २ मे पासून सुरु होणाऱ्या ‘तुझेच मी गीत गात आहे’ मालिकेची प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता आहे. मालिकेच्या प्रोमोना भरभरुन प्रतिसाद मिळत असून प्रोमोमध्ये दिसणारे लोकेशन्स सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेत आहेत. तुझेच मी गीत गात आहे या मालिकेसाठी रिअल लोकेशनचा वापर करण्यात येतोय. या मालिकेचं कथानक नागपूरमधील एका गावात घडतं. त्यामुळे शूटसाठी खऱ्या गावाची निवड करण्यात आली आहे. मालिकेत दिसणारी घरं, आजूबाजूचा परिसर आणि विशेष म्हणजे गावकरी हे सगळं खरंखुरं असून वास्तवादी चित्रण करण्यासाठी संपूर्ण टीम मेहनत घेत आहे.
अभिनेत्री उर्मिला कोठारेला याआधी आपण ग्लॅमरस रुपात पाहिलं आहे. मात्र या मालिकेत ती नो मेकअप लूकमध्ये दिसणार आहे. अत्यंत हालाखिच्या परिस्थितीत आपल्या मुलीच्या भवितव्यासाठी झगडणारी आई उर्मिला या मालिकेत साकारते आहे. त्यामुळेच साधी साडी आणि वेणी अश्या नॉन ग्लॅमरस रुपात उर्मिला भेटीला येईल.
रणरणत्या उन्हात शूट करताना तिची कसोटी लागतेय. भूमिकेला पुरेपुर न्याय देण्यासाठी उर्मिलाने कंबर कसली आहे. तुझेच मी गीत गात आहे मालिकेतून उर्मिला जवळपास १२ वर्षांनंतर टीव्ही विश्वात पुनरागमन करणार आहे. गाण्याचं स्वप्न उराशी बाळगलेल्या आणि अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत ते पूर्ण करण्यासाठी झटणाऱ्या चिमुकल्या स्वराची गोष्ट या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येईल.