नवऱ्याच्या निधनाने खचून गेलेल्या सुरेखा कुडची, पदरात होती अडीच वर्षाची मुलगी, सांगितला कठीण काळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2025 19:00 IST2025-09-23T19:00:21+5:302025-09-23T19:00:53+5:30
'सन मराठी' वरील 'जुळली गाठ गं' या मालिकेत दामिनी मुजुमदार हे पात्र साकारणाऱ्या सुप्रसिद्ध अभिनेत्री सुरेखा कुडची यांनी नवरात्री उत्सवानिमित्त त्यांच्या आयुष्यातील कठीण प्रसंग सांगितला आहे.

नवऱ्याच्या निधनाने खचून गेलेल्या सुरेखा कुडची, पदरात होती अडीच वर्षाची मुलगी, सांगितला कठीण काळ
नवरात्री म्हणजे स्त्रीशक्ती, धैर्य आणि प्रेरणेचं प्रतीक. या नऊ दिवसांत देवीच्या विविध रूपांची आराधना करताना प्रत्येक महिलेला आपलं सामर्थ्य जाणवतं. प्रत्येक स्त्री मध्ये एक नवदुर्गा दडलेली असते कठीण प्रसंगावेळी स्त्रीमधील शक्ती त्या प्रसंगाशी सामना करते. 'सन मराठी' वरील 'जुळली गाठ गं' या मालिकेत दामिनी मुजुमदार हे पात्र साकारणाऱ्या सुप्रसिद्ध अभिनेत्री सुरेखा कुडची यांनी नवरात्री उत्सवानिमित्त त्यांच्या आयुष्यातील कठीण प्रसंग सांगितला आहे.
अभिनेत्री सुरेखा कुडची म्हणाल्या की, "सर्वप्रथम प्रेक्षकांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा! नवरात्री म्हटलं की एक वेगळीच ऊर्जा अनुभवायला मिळते. प्रत्येक स्त्रीमध्ये प्रचंड शक्ती असते. कठीण प्रसंगाला कसं सामोरं जायचं आणि कुटुंबाचं रक्षण कसं करायचं हे तिला उत्तम ठाऊक असतं. स्त्री स्वतःसाठी कमी आणि कुटुंबासाठी जास्त जगते. त्यामुळे माझा प्रत्येक स्त्रीला तिच्या सामर्थ्याला सलाम आहे. माझ्या आयुष्यात अनेक अडचणी आल्या, पण ज्याने मला नव्याने जगायला शिकवलं तो प्रसंग म्हणजे माझ्या पतीचं निधन. त्या क्षणी मी खूप खचून गेले. हातात अडीच वर्षांची मुलगी आणि पतीचं जाणं सहन करणं खूप कठीण होतं. प्रत्येक स्त्रीसाठी पुरुषाचा आधार महत्त्वाचा असतो. मी स्वतःच्या पायावर उभी होते, तरीही सोबतीची उणीव जाणवत होती. त्या प्रसंगातून बाहेर पडायला मला जवळपास सहा महिने लागले. त्या काळात माझ्या कुटुंबाने खूप आधार दिला. माझ्या बहिणीने सांगितलं, ‘पुन्हा कामाला सुरुवात कर, आता तुला तुझ्या मुलीसाठी खंबीर राहावं लागेल.’ त्यानंतर मी नव्या जोमाने काम सुरू केलं."
यापुढे त्या म्हणाल्या की, "मी स्वामींना एकच प्रार्थना केली की, माझ्या मुलीला कधीच काही कमी पडू नये. पैशाअभावी काही देता आलं नाही असं तिला कधी म्हणावं लागू नये, हीच माझी इच्छा होती. आजही तिचं शिक्षण सुरु आहे आणि आमच्यावर स्वामींची कृपा आहे असं मी मानते. नवरात्रीच्या निमित्ताने मला माझ्या सखी-मैत्रिणींना एवढंच सांगावसं वाटतं, स्वतःच्या पायावर उभं राहा. किमान स्वतःचा खर्च भागवू शकाल इतकं तरी काम नक्की करा. आणि प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या."