"ओ दीदी, आता भारताकडे काम मागू नका", पाकिस्तानी अभिनेत्रीसाठी टीव्ही अभिनेत्याची पोस्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2025 16:03 IST2025-05-09T16:03:20+5:302025-05-09T16:03:46+5:30
भारताच्या ऑपरेशन सिंदूरची पाकिस्तानी कलाकार फवाद खान, माहिरा खान, हानिया आमिर यांनी निंदा केली होती. आता टीव्ही अभिनेत्याने पाक कलाकारांना चांगलंच सुनावलं आहे.

"ओ दीदी, आता भारताकडे काम मागू नका", पाकिस्तानी अभिनेत्रीसाठी टीव्ही अभिनेत्याची पोस्ट
भारत-पाकिस्तानमधील तणाव काल युद्धजन्य परिस्थितीला गेलेला पाहायला मिळाला. काल रात्री पाकिस्तानने जम्मूमध्ये ड्रोन हल्ला केला. त्याला भारतीय सैन्याने परतवून लावलं. जम्मू काश्मीर, गुजरात, अमृतसर, भूजसह अनेक ठिकाणी ब्लॅकआऊट केलं गेलं. भारताने पाकिस्तानच्या लाहोरवरही हल्ला केला. दुसरीकडे पाकिस्तानचा कोणताही मनोरंजन कंटेंट आणि पाक कलाकारांचे अकाऊंट्स भारतात बॅन करण्यात आले आहेत. भारताच्या ऑपरेशन सिंदूरची पाकिस्तानी कलाकार फवाद खान, माहिरा खान, हानिया आमिर यांनी निंदा केली होती. आता टीव्ही अभिनेता अविनाश मिश्राने पाक कलाकारांना चांगलंच सुनावलं आहे.
२२ एप्रिल रोजी पहलगाम दहशतवादी हल्ल्यात भारताच्या २६ पर्यटकांचा मृत्यू झाला. यानंतर भारताने 'ऑपरेशन सिंदूर'च्या माध्यमातून पाकिस्तानातील दहशतवादी अड्डयांवर हल्ला केला. अनेक दहशतवादी मारले गेले. याने पाकिस्तानचंही नुकसान झालं. भारताच्या रोखठोक उत्तर दिलं असलं तरी फवाद खान, माहिरा खान सारख्या पाक कलाकारांनी भारताच्या या कारवाईची निंदा केली. भारताने केलेला हल्ला भ्याड हल्ला असल्याचं म्हटलं. पाक कलाकारांच्या या पोस्टनंतर अभिनेता अविनाश मिश्राने लिहिले, "ओ माहिरा दीदी, पाकिस्तानला दोष देण्याची आम्हाला गरज नाही. पाकिस्तान दहशतवाद्यांना पाठीशी घालतं याचा पुरावा संपूर्ण जगाने पाहिला आहे. आता फक्त परिस्थिती सुधारल्यानंतर आमच्या भारतात काम मागायला येऊ नका. पण तुम्ही तुमच्या देशाची बाजू घेतलीत त्यासाठी तुमचं अभिनंदनच. इथे काही सेलिब्रिटी त्यांच्या REACH आणि फॉलोअर्सच्या काऊंटमध्ये गद्दारी करत आहेत. पण टेन्शन नाही त्यांचाही नंबर येईल."
अविनाश मिश्रा 'बिग बॉस १८' मुळे प्रसिद्धीझोतात आला. काही हिंदी मालिकांमध्ये तो झळकला आहे. 'मरियम खान रिपोर्टिंग लाईव्ह','प्यार तुने क्या किया', 'तितली' यासारख्या मालिकांमध्ये त्याने काम केलं आहे.