फोटोवर कमेंट करणाऱ्या युजरला जुई गडकरीने फटकारले, पुन्हा कधीच करणार नाही अशी हिंमत
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2021 17:02 IST2021-06-01T16:53:17+5:302021-06-01T17:02:55+5:30
जुई गडकरी सोशल मीडियावर खूप सक्रीय असते आणि ती नेहमी आपल्या आगामी प्रोजेक्टबद्दल अपडेट सोशल मीडियाच्या माध्यमातून देत असते.

फोटोवर कमेंट करणाऱ्या युजरला जुई गडकरीने फटकारले, पुन्हा कधीच करणार नाही अशी हिंमत
सध्या सोशल मीडियाचा जमाना आहे. सेलिब्रेटींसाठीही चाहत्यांसह कनेक्ट राहण्यासाठी सोशल मीडिया हा उत्तम पर्याय. पण बऱ्याच वेळा सोशल मीडियावर त्यांना ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. काही कलाकार याकडे दुर्लक्ष करतात तर काही ट्रोलर्सला सडेतोड उत्तर देताना दिसतात. असेच काहीसे अभिनेत्री जुई गडकरी सोबतही घडले आहे. ट्रोल करणाऱ्या युजरला तिने सडेतोड उत्तर दिले आहे.
अभिनेत्री जुई गडकरी सोशल मीडियावर खूप सक्रीय असते आणि ती नेहमी आपल्या आगामी प्रोजेक्टबद्दल अपडेट सोशल मीडियाच्या माध्यमातून देत असते. याशिवाय ती नेहमी सोशल मीडियावर फोटोही शेअर करत असते आणि या फोटोंतून ती प्रेक्षकांना चांगलीच भुरळ पाडताना दिसते. मात्र नुकताच जुईने ब्लॅक आणि व्हाईट शेडमधला फोटो शेअर केला होता. हा फोटो शेअर होताच अनेकांनी लाईक्स आणि कमेंट्स देत प्रचंड पसंती दिली.
मात्र काही युजर्सना तिचा हा अंदाज काही रुचला नाही. युजरने नापसंती देत जुईला लाईमलाईटमध्ये राहायचे असेल तर हॉट फोटोशूट करावे अशी कमेंट केली. तर दुस-या युजरने तिला पब्लिसिटी मिळवण्यासाठी तुला कॉन्ट्रोव्हर्सी करावी लागेल तरच लाईम लाईटमध्ये येशील अशा विनाकारण उगाचच कमेंट केल्या.
यावर जुईने गप्प न राहता अतिशय सभ्य भाषेत युजर्सना प्रत्युत्तर दिले आहे. खुद्द जुईने असे कमेंट्स करणा-यांचे थेट त्यांच्या नावासकट सोशल मीडियावर स्क्रीन शॉट्स शेअर केले आहेत. जुई गडकरीने वेळीच ट्रोलर्सची बोलती बंद केल्यामुळे इतरही यातून धडा घेतील आणि उगाच सेलिब्रेटींना ट्रोल करण्याआधी विचार करतील.