पुण्यातील येरवडा जेलमध्येही पाहिली जाते 'ही' मालिका
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2025 19:15 IST2025-02-07T19:14:52+5:302025-02-07T19:15:28+5:30
या मालिकेला अल्पावधीतच प्रेक्षकांची पसंती मिळाली.

पुण्यातील येरवडा जेलमध्येही पाहिली जाते 'ही' मालिका
'कॉन्स्टेबल मंजू' मालिका (Constable Manju Serial) सध्या रंजक वळणावर आली आहे. सत्या व मंजूला एकमेकांसमोर प्रेमाची कबुली कधी देणार हा प्रश्न प्रेक्षकांना पडला होता. पण सत्याने मंजूला प्रपोज केल्यानंतर मंजूने सत्याला नकार दिला. हा एपिसोड पाहून प्रेक्षकांनाही धक्का बसला होता. सत्या व मंजू यांचा दुरावा पाहून प्रेक्षकही भावूक झाले होते. पण आता हा दुरावा लवकरच संपून सत्या-मंजू नव्याने एकत्र येणार असून मंजू सत्या समोर तिच्या प्रेमाची कबुली फेब्रुवारी महिन्यात देणार आहे. या मालिकेत सत्या ही भूमिका साकारणारा अभिनेता वैभव कदमने प्रेक्षकांच्या प्रतिसादाबद्दल एक किस्सा शेअर केला आहे.
अभिनेता वैभव कदम म्हणाला की, "'कॉन्स्टेबल मंजू' मालिकेचे शूटिंग सातारामध्ये सुरु असल्याने मी जेव्हा ही साताऱ्यात फिरत असतो तेव्हा सत्या दादा अशी हाक मला मारली जाते. हे ऐकून आपल्या माणसांनी हाक मारली असे जाणवते. नुकतेच आम्हाला कळले की, येरवडा जेलमध्ये न चुकता 'कॉन्स्टेबल मंजू' मालिका पाहिली जाते. आमच्या सेटवर महिला पोलीस आल्या होत्या तेव्हा त्यांनी आवर्जून सांगितले की, जेलमध्ये ज्या महिला कैदी आहेत त्या आमच्याकडे हट्ट करतात रात्री ८ वाजता आम्हाला 'सन मराठी' चॅनेल लावून द्या. हे सगळे ऐकून मी भारावून गेलो. या मालिकेमुळे मला एक नवी ओळख मिळाली आहे. प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया ऐकून मला काम करण्याची ऊर्जा येते."
पुढे वैभव म्हणाला की, "माझे बाबा दुबईमध्ये राहतात त्यामुळे दुबईमधून ते माझी मालिका पाहतात आणि दररोज रात्री फोन करून आजच्या भागात काय घडले, कोणता सीन उत्तम झाला किंवा अजून मी कोणती गोष्ट छान करू शकलो असतो हे सांगतात. खरेच या मालिकेमुळे माझे आयुष्य बदलून गेले आहे. हे सगळं श्रेय 'सन मराठी' चॅनेल, मालिकेची संपूर्ण टीम, माझे कुटुंब व प्रेक्षकवर्गाला जाते. प्रेक्षकांना इतकेच सांगायला आवडेल मालिकेवर खूप प्रेम करा, तुमच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहचवत जा आणि आता लवकरच सत्या- मंजू एकत्र येणार आहे त्यामुळे एकही भाग चुकवू नका."