Akshaya Deodhar-Hardik Joshi Wedding : 'मग राणाजी राणाजी करत...', अक्षयाने हार्दिकसाठी घेतला हटके उखाणा, व्हिडीओ झाला व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2022 17:03 IST2022-12-02T17:02:41+5:302022-12-02T17:03:23+5:30
Akshaya-Hardik Wedding : अक्षयाने हार्दिकसाठी भला मोठा उखाणा घेतला आहे. तिचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

Akshaya Deodhar-Hardik Joshi Wedding : 'मग राणाजी राणाजी करत...', अक्षयाने हार्दिकसाठी घेतला हटके उखाणा, व्हिडीओ झाला व्हायरल
तुझ्यात जीव रंगला फेम राणादा आणि पाठकबाई म्हणजेच हार्दिक जोशी व अक्षया देवधर आज (२ डिसेंबर) लग्नबेडीत अडकले आहेत. मेहंदी, हळदी, संगीत कार्यक्रमानंतर हार्दिक व अक्षयाच्या लग्न सोहळ्याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले होते. पुण्यात त्यांचा लग्न सोहळा पारंपारिक पद्धतीने पार पडला. या लग्नसोहळ्याला त्या दोघांच्या नातेवाईक परिवारासोबत मराठी सिनेइंडस्ट्रीतील कलाकारदेखील उपस्थित होते. त्यांच्या लग्नाचे सध्या व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत. दरम्यान आता एका व्हिडीओनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. हा व्हिडीओ म्हणजे अक्षयानं हार्दिकसाठी घेतलेला हटके उखाणा.
रिसेप्शनच्या आधी अक्षयाने हार्दिकसाठी भला मोठा उखाणा घेतला. उखाणा घेण्यापूर्वी अक्षया म्हणाली की, हा उखाणा मी आणि माझी जवळची मैत्रीण रिचा आपटे आम्ही दोघींनी मिळून तयार केला आहे. त्यानंतर अक्षया उखाणा घ्यायला सुरुवात करते.
अक्षया सांगू लागली की, खरंतर उखाणा असतो दोन ओळींचा फक्त पण संधी चालून आली आहे तर होईन म्हणतेय व्यक्त. कामासाठी घर सोडून धरली वेगळी वाट, प्रेमापायी कोल्हापुरच्या पाहुणशाही थाट. मग राणाजी राणाजी करत दिवस गेले सरुन. राणासारख्या खऱ्या माणसाचा ठेवला हात धरून. तुझ्यात जीव रंगता रंगता वेळ आली निघायची. कुठेतरी एक खात्री होती पुन्हा एकत्र येण्याची. दोघांनी मिळून निर्णय घेतला आयुष्यभराच्या साथीचा. अक्षय तृतिया मुहूर्त ठरला आमच्या साखरपुड्याचा. उखाणा घेते म्हणत म्हणत कहाणी झाली सांगून. हो... हो.. आता घेते नाव ऐका कान देऊन...आता घेते नाव ऐका कान देऊन... उखाण्यासाठी विचार करून शक्कल लढवली अशी... माझंही नाव घेते तेवढ्यात आता अक्षया हार्दिक जोशी.
अक्षयाने उखाणा घेतल्यावर उपस्थित असलेल्या सर्वांनी टाळ्या वाजवल्या. अक्षयाला उखाणा घेताना पाहून हार्दिकही अगदी खूश होतो. तो तिच्याकडे एकटक पाहत बसतो. अक्षयाने घेतलेला उखाणा सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. हार्दिक व अक्षयाने लग्नाच्या विधींसाठी पारंपारिक खास लूक केला होता. दोघंही खूप सुंदर दिसत होते. आता दोघांच्या रिसेप्शन सोहळ्याला सुरुवात झाली आहे. हार्दिकने चक्क घोड्यावर बसून मंडपात एन्ट्री केली आहे.