राम नवमीचा अलौकिक उत्सव रंगणार 'जय जय स्वामी समर्थ' मालिकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2025 18:45 IST2025-04-03T18:44:13+5:302025-04-03T18:45:07+5:30

Jai Jai Swami Samarth Serial : 'जय जय स्वामी समर्थ' मालिकेत येत्या रविवारी ६ एप्रिलला रामनवमी विशेष भाग प्रसारित होणार आहे. या भागात भक्तांना श्रद्धा, निष्ठा आणि स्वामी लीलांचा अनोखा संगम पाहायला मिळणार आहे.

The supernatural celebration of Ram Navami will be celebrated in the series 'Jai Jai Swami Samarth' | राम नवमीचा अलौकिक उत्सव रंगणार 'जय जय स्वामी समर्थ' मालिकेत

राम नवमीचा अलौकिक उत्सव रंगणार 'जय जय स्वामी समर्थ' मालिकेत

कलर्स मराठीवरील 'जय जय स्वामी समर्थ' मालिकेत (Jai Jai Swami Samarth Serial) येत्या रविवारी ६ एप्रिलला रामनवमी विशेष भाग प्रसारित होणार आहे. या भागात भक्तांना श्रद्धा, निष्ठा आणि स्वामी लीलांचा अनोखा संगम पाहायला मिळणार आहे. रामनवमीच्या पवित्र पर्वावर स्वामीस्थानावर भक्तगण मोठ्या संख्येने एकत्र आले आहेत. 

गावकरी रामनवमीच्या निमित्ताने सजावट करताना दिसत आहेत, ज्यामध्ये मनोहर, वत्सला, उदय आणि इतर गावकरी सहभागी आहेत. याचवेळी, हातात पूजेचे ताट घेऊन मीरा येताना दिसते. तिने सुवासिनीसारखा वेश परिधान केला आहे. मात्र, तिला पाहताच गावकऱ्यांमध्ये कुजबूज सुरू होते. यावेळी मोरोपंत स्पष्ट शब्दांत म्हणतो की, "विधवा स्त्रीने पूजा करणे धर्माला मान्य नाही!" यावर मीरा ठाम उत्तर देते, "धर्म मनाने आणि श्रद्धेने मोठा असतो, बंधनांनी नाही!" तिच्या या उत्तराने वातावरण गंभीर होतं. वत्सला इतर महिलांना उद्देशून म्हणते, "बघता काय, हिसकावून घ्या तिच्या गळ्यातलं मंगळसूत्र!" काही स्त्रिया तिच्या दिशेने धावतात. याच क्षणी, मीरा बाजूला पडलेली कुर्हाड पाहते आणि ती उचलते. अचानक ढगांचा गडगडाट होतो, सोसाट्याचा वारा सुटतो, वीज चमकते आणि त्या ठिकाणी स्वामी अवतरतात. संपूर्ण गाव अचंबित होऊन स्वामींकडे पाहते. 

स्वामी रामाच्या अवतारात दिसणार

मीरा स्वतःच्या हाताकडे पाहते, तर तिच्या हातात कुऱ्हाडीच्या जागी चाफ्याची फुले असतात. मोरोपंत, वत्सला, उदय अवाक होऊन स्वामींकडे पाहतात. गावकरी हात जोडतात. मीरा स्वतःच्या हातातील फुले स्वामींच्या चरणी अर्पण करते. आणि जेव्हा ती वर पाहते, तेव्हा स्वामी रामाच्या अवतारात तिला दिसतात. त्यांच्या तेजस्वी रूपाने सर्वांनाच स्तब्ध केले. त्या दिव्य दृश्यामध्ये स्वामी मीराला आशीर्वाद देत म्हणतात, "सौभाग्यवती भवः..." याने संपूर्ण गाव अचंबित होते, या स्वामी लीलेचा अर्थ काय हे मालिकेच्या आगामी भागात उलगडले जाणार आहे. 


याच भागापासून राम आणि सीतेच्या नात्याचा गूढ संदेश स्वामी उलगडतात. पती-पत्नीच्या नात्यात विश्वास किती महत्त्वाचा आहे, यावर त्यांनी भर दिला. याचवेळी, सत्यवान आणि कलावतीच्या संघर्षाची कथा उलगडण्याचा आरंभ होतो. सत्यवान अत्यंत धार्मिक नवरा असून कलावती त्याच्यावर निस्सीम प्रेम करणारी पत्नी आहे. त्यांच्या नात्यात येणाऱ्या अडचणी, समाजाने लावलेले आरोप आणि त्यातून मिळणारा स्वामींचा आशीर्वाद—ही कथा प्रत्येकाला अंतर्मुख करणारी ठरेल.

Web Title: The supernatural celebration of Ram Navami will be celebrated in the series 'Jai Jai Swami Samarth'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.