‘थोडं तुझं आणि थोडं माझं’मध्ये उलगडणार नात्यांची गोष्ट, या दिवशी भेटीला येणार मालिका
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2024 13:54 IST2024-06-14T13:53:47+5:302024-06-14T13:54:10+5:30
Thoda Tuza Thoda Maza : अभिनेत्री शिवानी सुर्वे आणि अभिनेता समीर परांजपे यांची जोडी 'थोडं तुझं आणि थोडं माझं' या मालिकेतून रसिकांच्या भेटीला येत आहे.

‘थोडं तुझं आणि थोडं माझं’मध्ये उलगडणार नात्यांची गोष्ट, या दिवशी भेटीला येणार मालिका
सध्या छोट्या पडद्यावर नवनवीन मालिका दाखल होत आहे. १७ जूनपासून स्टार प्रवाहवर नवी मालिका थोडं तुझं आणि थोडं माझं (Thoda Tuza Thoda Maza ) ही मालिका दाखल होत आहे. देवयानी मालिकेतून घराघरात पोहोचलेली प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री शिवानी सुर्वे (Shivani Surve) आणि गोठ मालिकेमधून लोकप्रियता मिळालेला अभिनेता समीर परांजपे (Sameer Paranjape) यांची जोडी या मालिकेतून रसिकांच्या भेटीला येत आहे. अभिनेत्री मानसी कुलकर्णी देखील या मालिकेच्या निमित्ताने तब्बल १० वर्षांनंतर मालिकाविश्वात पदार्पण करणार आहे.
तब्बल ९ वर्षांनंतर पुन्हा एकदा मालिकेत काम करण्यासाठी अभिनेत्री शिवानी सुर्वे फारच उत्सुक आहे. ती सांगते की, स्टार प्रवाह कुटुंबासोबत पुन्हा एकदा जोडली जातेय याचा आनंद आहे. स्टार प्रवाहच्या मालिकांचे विषय, त्याची मांडणी मला खूपच भावते. त्यामुळेच थोडं तुझं आणि थोडं माझं मालिकेसाठी मी लगेच होकार दिला. मानसी हे पात्र मला अतिशय आवडलं. देवयानी मालिकेला प्रेक्षकांचं भरभरुन प्रेम मिळालं. हेच प्रेम आणि यश माझ्या नव्या मालिकेलाही मिळेल याची खात्री आहे.
तर तेजस या व्यक्तिरेखविषयी सांगताना समीर म्हणाला, तेजस ही व्यक्तिरेखा खूपच वेगळी आहे. तो खोडकर आहे. त्याला कुणी डिवचलं तर तो आपलं म्हणणं खरं करण्यासाठी वाट्टेल ते करु शकतो. मालिकेचं नाव आणि गोष्ट खूपच भावली मला. प्रत्येक वगोगटाला आपलीशी वाटेल अशी गोष्ट आणि पात्र या मालिकेची जमेची बाजू म्हणता येईल. अभिनेत्री मानसी कुलकर्णी गायत्री प्रभू हे पात्र साकारणार आहे. गायत्री हे पात्र खूपच हटके आहे. तिची महत्त्वाकांक्षा तिच्या वागण्या-बोलण्यातून जाणवते. आपल्यापेक्षा वरचढ ठरणारं कुणी असू नये यासाठी तिची सतत धडपड सुरु असते, असे मानसीने म्हटले.
थोडं तुझं आणि थोडं माझं मालिका १७ जूनपासून भेटीला
स्टार प्रवाह प्रस्तुत थोडं तुझं आणि थोडं माझं मालिकेची निर्मिती अतुल केतकर आणि अपर्णा केतकर यांच्या राईट क्लिक मीडिया सोल्युशन्स या निर्मिती संस्थेने केली आहे. दिग्दर्शक चंद्रकांत कणसे या मालिकेच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळत आहेत. थोडं तुझं आणि थोडं माझं मालिका १७ जूनपासून रात्री ९ वाजता फक्त स्टार प्रवाहवर पाहायला मिळणार आहे.