रुपाली भोसलेमध्ये दडलेली सुगरण येणार प्रेक्षकांसमोर, म्हणते - "प्रेक्षकांना पोटभरुन..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2025 17:44 IST2025-04-14T17:44:11+5:302025-04-14T17:44:29+5:30
Rupali Bhosle : अभिनेत्री रुपाली भोसले लवकरच शिट्टी वाजली रे या नव्या कार्यक्रमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

रुपाली भोसलेमध्ये दडलेली सुगरण येणार प्रेक्षकांसमोर, म्हणते - "प्रेक्षकांना पोटभरुन..."
'शिट्टी वाजली रे'च्या मंचावर रुपाली भोसले बनवणार नवनवे पदार्थ आई कुठे काय करते मालिकेतून घराघरात पोहोचलेली संजना म्हणजेच अभिनेत्री रुपाली भोसले लवकरच शिट्टी वाजली रे या नव्या कार्यक्रमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मालिकेत संजनाला स्वयंपाकाची जराही आवड नव्हती मात्र रुपाली उत्तम स्वयंपाक बनवते. शिट्टी वाजली रेचा मंच रुपालीमध्ये दडलेली सुगरण संपूर्ण महाराष्ट्रासमोर आणणार आहे.
शिट्टी वाजली रेबद्दल रुपाली म्हणाली की, मला स्वयंपाकाची अतिशय आवड आहे. मला जेवण बनवायलाही आवडतं आणि खाऊ घालायलाही आवडतं. मी किचनमध्ये तासनतास रमते. शिट्टी वाजली रे कार्यक्रमासाठी जेव्हा मला विचारलं तेव्हा मी लगेच होकार दिला. स्वयंपाक ही आवडीची गोष्ट असल्यामुळे हा मंच माझ्यासाठी खूप खास असणार आहे. कार्यक्रमाची टीम अतरंगी आहे. खूप कल्ला करणार आहोत आम्ही सगळे. प्रेक्षकांना पोटभरुन हसवणं हेच या कार्यक्रमाचं वेगळेपण असेल.
कलाकारांचं कलाकौशल्य आपण मालिका, नाटक आणि सिनेमांमधून पहातच असतो. मात्र त्यांचं आजवर कधीही न पाहिलेलं पाककौशल्य शिट्टी वाजली रे च्या मंचावरून पहिल्यांदा महाराष्ट्रासमोर येणार आहे. सहजरित्या आपल्या अभिनयाने आणि नृत्याने मनं जिंकणारे हे कलाकार स्वयंपाकात खरंच कुशल आहेत का याची पोलखोल शिट्टी वाजली रे चा मंच करणार आहे. थोडक्यात काय पोटभर खायला घालणारी नाही तर स्वयंपाक करता करता पोटभर हसवणाऱ्या कलाकार जोडीचा शोध हा कार्यक्रम घेणार आहे. लोकप्रिय अभिनेता अमेय वाघ हा कार्यक्रम होस्ट करणार असून पूर्णब्रह्म या मराठी रेस्टॉरण्टच्या संचालिका जयंती कठाळे सेलिब्रिटी शेफची भूमिका पार पाडतील. शिट्टी वाजली रे २६ एप्रिल पासून रात्री ९ वाजता स्टार प्रवाहवर पाहायला मिळेल.