अभिनयासोबत कॉर्पोरेट क्षेत्रातही सक्रिय, 'ठरलं तर मग'मधील अर्जुन करतो दोन नोकऱ्या!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2025 15:44 IST2025-07-29T15:41:21+5:302025-07-29T15:44:01+5:30
'ठरलं तर मग'मधील अर्जुन करतो दोन नोकऱ्या!

अभिनयासोबत कॉर्पोरेट क्षेत्रातही सक्रिय, 'ठरलं तर मग'मधील अर्जुन करतो दोन नोकऱ्या!
स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिका 'ठरलं तर मग' सध्या चर्चेत आहेत. गेली अनेक वर्ष ही मालिका टीआरपीच्या शर्यतीतही अव्वल स्थानावर असलेली पाहायला मिळाली आहे.या मालिकेत अभिनेता अमित भानुशाली हा अर्जुन सुभेदार हे पात्र साकारत आहे. या मालिकेतील त्याच्या अभिनयाचं कायम कौतुक होतं. अमित भानुशाली सध्या प्रेक्षकांच्या मनात घर करून बसला आहे. अशातच अमितबद्दल एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. अमित हा अभिनयासोबतच कॉर्पोरेट क्षेत्रात सक्रीय आहे. याबद्दल त्यानं एका मुलाखतीमध्ये सांगितलं.
अमित हा अभिनयासोबतच कॉर्पोरेट क्षेत्रात अॅड, जिंगल्स तयार करण्याचं आणि व्हिडीओ एडिटिंगचं काम करत करतो. नुकतंच एका मुलाखतीमध्ये त्यानं याबद्दल सांगितलं. 'इट्स मज्जा मराठी' या युट्युब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत अमित म्हणाला, "अडचण ही आहे की, दिवसांत २४ तास आहेत. अजून जास्त तास असते तर मजा आली असती, अजून काम करता आलं असतं. मी फक्त चार तास झोपतो, जास्तीत जास्त पाच तास. त्याहून जास्त मला झोप लागत नाही. सकाळी वर्कआऊट झाल्यानंतर शूटिंगसाठी निघतो. याव्यतिरिक्त मी ऍनिमेशनही करतो, मी एडिटिंग करतो. मी कॉर्पोरेटसाठी ऍड, जिंगल्स बनवायचंही काम करतो".
त्यानं सांगितलं, "रोजचे त्यांचे काही व्हिडीओ असतात, त्यांना एडिट करुन हवे असतात, ते मी करतो. कधी टेक्स्ट ऍनिमेशन कधी २डी ऍनिमेशन असतात. माझा स्वतःचा सेटअप आहे. लॅपटॉप तर नेहमी माझ्याबरोबर असतो. जेव्हा सीन नसतो, तेव्हा मी ते काम करतो", असं त्यानं सांगितलं. एक कलाकार केवळ अभिनयापुरता मर्यादित न राहता इतर कौशल्यं जोपासत आपला विस्तार करू शकतो, हे अमितनं दाखवून दिलंय.