"मी माझ्या वडिलांचंच नाव लावणार, कारण...", लग्नानंतर नवऱ्याचं आडनाव लावण्यास 'ठरलं तर मग' अभिनेत्रीचा स्पष्ट नकार
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2025 17:13 IST2025-08-10T17:12:58+5:302025-08-10T17:13:26+5:30
मोनिकाचं लग्न झालेलं असूनही ती तिच्या वडिलांचं आडनाव लावते. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत यामागचं कारण अभिनेत्रीने सांगितलं.

"मी माझ्या वडिलांचंच नाव लावणार, कारण...", लग्नानंतर नवऱ्याचं आडनाव लावण्यास 'ठरलं तर मग' अभिनेत्रीचा स्पष्ट नकार
'ठरलं तर मग' ही छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय आणि टीआरपीच्या शर्यतीत अव्वल असणारी मालिका. या मालिकेत अस्मिता ही भूमिका साकारून अभिनेत्री मोनिका दबडे घराघरात पोहोचली. मोनिका सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असते. ती प्रोफेशनल आणि वैयक्तिक आयुष्यातील अपडेट्स ती चाहत्यांना देत असते. मोनिकाचं लग्न झालेलं असूनही ती तिच्या वडिलांचं आडनाव लावते. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत यामागचं कारण अभिनेत्रीने सांगितलं.
मोनिकाने नुकतीच इट्स मज्जा या युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीत ती म्हणाली, "माझ्या वडिलांचं आडनाव दबडे आहे. मी त्यांचं आडनाव लावणार कारण हे त्यांनी मला दिलेलं आहे. चिन्मय माझा नवरा आहे ही माझी वेगळी ओळख आहे. पण, माझ्या प्रोफोशनल लाइफमध्ये मी जी काही आहे ती माझ्या वडिलांमुळे आहे. माझ्यावर झालेल्या संस्कारांमधून मी तयार झाली आहे. त्यामुळे ती ओळख मी सोडू शकत नाही. आणि त्यामुळे मी माझ्या वडिलांचंच नाव लावणार. त्यांनी मला शिकवलं. त्यांनी मला मोठं केलं. त्यांनी मला घडताना बघितलं".
"आता मी नवऱ्याच्या घरी जाऊन त्याचं आडनाव लावणं...तर त्याच्यासाठी माझी मुलगी आहे. तिला मी तिच्या बाबाचंच आडनाव देणार आहे. आम्ही एकत्र आहोतच की... वेगळे झालेलो नाही. माझ्या वडिलांनी मला दिलेली ओळख हीच मला शेवटपर्यंत ठेवायची आहे. हे माझं प्रांजळ मत आहे. यावर खूप लोकांचं असतं की मग नवऱ्याची ओळख वगैरे... तर त्याचं स्वरुप म्हणजे माझी वृंदा. पण, माझ्या वडिलांनी मला जे दिलंय ते मी नाही विसरू शकत. मी माझ्या कोणत्याच डॉक्युमेंटवर नाव बदललेलं नाही. ते मी करणारही नाही", असंही ती म्हणाली.