"रस्त्याची दुरावस्था, ट्रॅफिक...", घोडबंदर अपघाताबाबत मराठी अभिनेत्रीची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाली-"सरकारचं दुर्लक्ष..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2026 17:21 IST2026-01-09T17:19:39+5:302026-01-09T17:21:48+5:30
घोडबंदर घाटात विचित्र अपघात;कंटेनरच्या धडकेमुळे वाहने एकमेकांवर आदळली,मराठी अभिनेत्रीने सांगितलं खरं कारण, म्हणाली...

"रस्त्याची दुरावस्था, ट्रॅफिक...", घोडबंदर अपघाताबाबत मराठी अभिनेत्रीची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाली-"सरकारचं दुर्लक्ष..."
Thane Ghodbunder Road Accident: ठाण्यातील घोडबंदर रोड हा एक महत्वाचा मार्ग आहे.या मार्गवरून रोड लाखो वाहने ये-जा करत असतात. या रस्त्याची दुरावस्था, टॅफिक यावर सर्वसामान्यांसह अनेक सेलिब्रिटी मंडळी आवाज उठवताना दिसतात. अशातच काल शुक्रवारी घोडबंदर घाटात सकाळी गंभीर अपघाताची घटना घडली. गायमुख घाट परिसरात तब्बल ११ वाहनांना एकमेकांना धडक बसल्याने या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. सिमेंट वाहून नेणारा कंटेनर ठाण्याकडे येत असताना नियंत्रण सुटल्याने विरुद्ध दिशेने बोरिवलीकडे जाणाऱ्या वाहनांना धडक दिल्याने हा भीषण अपघात घडला. या अपघाताचा थरारक व्हिडीओ शेअर करत मराठी अभिनेत्री ऋतुजा बागवेने संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.

ठाणे-घोडबंदर रोड हा नेहमीच ट्रॅफिकमुळे जाम असतो. याबद्दल अनेक सेलिब्रिटी मंडळी प्रतिक्रिया देतान दिसतात. त्यात काल ९ जानेवारीला येथील गायमुख घाटात विचित्र अपघात घडल्याने संपूर्ण परिसरात खळबळ माजली. त्यात आता या अपघाताबद्दल प्रतिक्रिया देत अभिनेत्री ऋतुजा बागवेने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. तसंच हा अपघात कसा घडला, याविषयी माहिती सुद्धा दिली आहे. ऋतुजाने शेअर केलेली पोस्ट पाहून हा अपघात किती भीषण होता, हे यावरून लक्षात येतं. यामध्ये तिने लिहिलंय,"विरुद्ध दिशेने गाडी टाकल्यामुळे अपघात घडला, असं म्हणून सरकारने कृपया हात झटकू नये."
त्यानंतर ऋतुजाने पुढे या अपघाताचं खरं कारण सांगितलंय. ती म्हणते- "खरं कारण रस्त्याची दुरावस्था, कायम ट्रॅफिक शिवाय ट्रॅफिक पोलीस नसणे..., सरकारचं दुर्लक्ष." असं म्हणत अभिनेत्रीने प्रतिक्रिया दिली आहे. दरम्यान, अभिनेत्रीच्या या पोस्टने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.या अपघातात चार जण जखमी झाले आहेत. सर्व जखमींना ओवळा येथील टायटन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. इतर काही वाहनांतील प्रवाशांना किरकोळ दुखापत झाल्याने त्यांनी खाजगी रुग्णालयात उपचार घेतल्याची माहिती समोर आली आहे.
नेमकं काय घडलं?
आज सकाळी सुमारे ७ वाजताच्या सुमारास गायमुख जकात नाक्याजवळ, घोडबंदर रोडवरील गायमुख घाट उतरणीवर टाटा कंपनीचा कंटेनर (MH 04 KF 0793) ठाण्याच्या दिशेने येत होता. सुमारे ३५ ते ४० टन सिमेंटच्या गोण्या वाहून नेणाऱ्या या कंटेनरने उतरणीवर नियंत्रण गमावल्याने समोरून येणाऱ्या वाहनांना जोरदार धडक दिली. अपघातानंतर कंटेनरचा चालक घटनास्थळावरून फरार झाला.