अर्धांगवायूच्या झटक्यामुळे या अभिनेत्रीला ओळखणं झालं कठीण, नवऱ्याने मागितली आर्थिक मदत
By तेजल गावडे | Updated: September 25, 2020 20:16 IST2020-09-25T20:16:07+5:302020-09-25T20:16:35+5:30
छोट्या पडद्यावरील अभिनेत्रीला पुन्हा अर्धांगवायूचा झटका आला आहे. उपचारासाठीदेखील तिच्याकडे पैसे नाहीत.

अर्धांगवायूच्या झटक्यामुळे या अभिनेत्रीला ओळखणं झालं कठीण, नवऱ्याने मागितली आर्थिक मदत
अभिनेत्री निशी सिंग भदलीला पुन्हा लकवा मारला आहे आणि आजारपणाच्या खर्चांमुळे तिचे कुटुंब आर्थिक अडचणीत सापडले आहे. तिचा नवरा लेखक आणि अभिनेता संजय सिंग भदलीने सांगितले की, आपल्या पत्नीच्या उपचारासाठी त्यांनी फ्लॅटदेखील गहाण ठेवला आहे. आता त्यांच्याकडे अजिबात पैसे नाहीत. पत्नीची दिवसरात्र काळजी घ्यावी लागते म्हणून त्यांच्याकडे कोणतेच काम नाही आणि कुटुंबाकडूनही मदत घेऊ शकत नाही.
संजय सिंग यांनी सांगितले की, मागील वर्षी फेब्रुवारीमध्ये अचानक निशीला घरी लकवा मारला आणि ती जमिनीवर कोसळली. त्यादरम्यान हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आणि तिथे सात - आठ दिवसांपर्यंत तिच्यावर उपचार करण्यात आले. तो वेळ असा होता जेव्हा निशी कुणालाच ओळखत नव्हती.
संजय यांनी पुढे सांगितले की, तिला थोडे बरे वाटल्यानंतर घरी आणले. ती बरी देखील होत होती पण यावर्षी रक्षाबंधनच्या दरम्यान पुन्हा लकवा मारला आणि शरीराच्या उजव्या बाजूने काम करणे बंद केले होते. आता तिला प्रत्येक कामासाठी सहाय्यकाची गरज पडते.
निशीने बऱ्याच मालिकेत काम केले आहे. हिटलर दीदी, कुबूल है, इश्कबाज आणि तेनाली रामा या मालिकेत तिने काम केले आहे. तिला दोन मुले आहेत. एक मुलगा आजीसोबत दिल्लीत राहतो आणि एक १६ वर्षांची मुलगी आहे जी तिच्यासोबत राहते.