मोठ्या ब्रेकनंतर तेजश्री प्रधान छोट्या पडद्यावर करणार एंट्री, तर 'हे' करणार काम
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2019 14:49 IST2019-07-10T14:46:36+5:302019-07-10T14:49:56+5:30
तेजश्री प्रधान 'अग्गंबाई सासूबाई' या मालिकेतून छोट्या पडद्यावर पुनरागमन करत आहे.

मोठ्या ब्रेकनंतर तेजश्री प्रधान छोट्या पडद्यावर करणार एंट्री, तर 'हे' करणार काम
छोट्या पडद्यावरील 'होणार सून मी या घरची' मालिकेतून जान्हवी या भूमिकेमुळे अभिनेत्री तेजश्री प्रधानने रसिकांचे मनोरंजन केले. अल्पावधीतच जान्हवी या भूमिकेमुळे तेजश्री प्रधान रसिकांची लाडकी अभिनेत्री बनली. आज तेजश्रीने मालिका, नाटक आणि चित्रपट या तीनही माध्यमात वेगवेगळ्या भूमिका साकारत आपलं एक वेगळंच स्थान निर्माण केले आहे. 'होणार सून मी या घरची' मालिका संपल्यानंतर छोट्या पडद्यावर तेजश्रीचे दर्शन काही रसिकांना घडले नाही. त्यामुळे रसिक तिला पाहण्यासाठी आतुर होते.
तेजश्री प्रधान 'अग्गंबाई सासूबाई' या मालिकेतून छोट्या पडद्यावर पुनरागमन करत आहे. तेजश्री सोबतच या मालिकेत निवेदिता सराफ, रवी पटवर्धन आणि गिरीश ओक हे प्रमुख भूमिका निभावताना दिसतील. दिग्गज कलाकारांचा मेळ असलेली ही मालिका नक्कीच रंजक असेल यात शंकाच नाही. नुकतंच या मालिकेचा प्रोमो रिलीज झाला आणि या प्रोमोमुळे प्रेक्षकांची मालिकेबद्दलची उत्सुकता आणखीनच वाढली आहे.
छोट्या पडद्यावर पुनरागमन करण्याबद्दल तेजश्री म्हणाली, "एक काळ असा होता जेव्हा मी नाटक, मालिका आणि चित्रपट एकत्र करत होती. माझ्या अनेक चाहत्यांना मला पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर पाहायचं होतं आणि त्यांनी तशी इच्छा देखील माझ्याकडे व्यक्त केली. चाहत्यांच्या प्रेमामुळेच मी पुन्हा एकदा टेलिव्हिजनकडे वळले असं मी म्हणेन.
'अग्गंबाई सासूबाई' ही मालिका २२ जुलै रोजी चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. ही एक हलकी फुलकी मनोरंजक मालिका असणार आहे आणि प्रेक्षकांना ती आवडेल अशी मी आशा करते."