'बिग बॉस १९' ची स्पर्धक तान्या मित्तलचा खुलासा; दोनदा प्रेमात झाली फसवणूक
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2025 11:04 IST2025-09-04T11:03:39+5:302025-09-04T11:04:14+5:30
तान्या तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल केलेल्या एका खुलाशामुळे चर्चेत आहे.

'बिग बॉस १९' ची स्पर्धक तान्या मित्तलचा खुलासा; दोनदा प्रेमात झाली फसवणूक
सध्या 'बिग बॉस १९'ची सर्वत्र चर्चा सुरू आहे. या शोमध्ये सहभागी झालेली सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर तान्या मित्तल ही पहिल्या दिवसापासूनच चर्चेचा विषय बनली आहे. तान्या 'बिग बॉस' मध्ये कायम तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलत असते. त्यामुळे तिला बरेचदा ट्रोल केलं जातं. यावेळी तान्या तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल केलेल्या एका खुलाशामुळे चर्चेत आहे. दोन वेळा प्रेमात धोका मिळाल्याचं तान्यानं सांगितलं.
'बिग बॉस १९'च्या घरात इतर सदस्यांसोबत बोलताना तान्याने सांगितले की, ती दोनदा रिलेशनशिपमध्ये होती, पण दोन्ही वेळा तिला धोका मिळाला. 'बिग बॉस'च्या स्वयंपाकघरात बसीर अलीने तिला डेटिंगबद्दल विचारले असता, तान्या म्हणाली, "मी काहीही केले नाही. माझी खूप फसवणूक झाली आहे. प्रत्येकाने स्वतःच्या फायद्यासाठी माझा वापर केला".
तान्याबद्दल सांगायचं तर ती सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर असून तिचे इन्स्टाग्रामवर २.५ मिलियन फॉलोअर्स आहेत. त्याचबरोबर तिचा स्वतःचा व्यवसायसुद्धा आहे. फक्त ५०० रुपयांपासून सुरुवात करून तिने एका हस्तकला ब्रँडची स्थापना केली, जो अल्पावधीच लोकप्रिय झाला आहे. तसेच ती उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशातील पर्यटन मंडळांसोबतही काम करत असून, कल्चरल अॅम्बेसिडर म्हणून वारसा आणि स्थानिक अनुभवांना प्रोत्साहन देते. याशिवाय ती लेखिका, कवयित्री आहे.