'तारक मेहता'मधील टप्पू आता मुख्य भूमिकेत झळकणार, 'या' अभिनेत्याला केलं रिप्लेस
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2026 13:51 IST2026-04-08T13:50:45+5:302026-04-08T13:51:31+5:30
राज अनाडकटला लागली लॉटरी, नव्या मालिकेत थेट हिरोची भूमिका

'तारक मेहता'मधील टप्पू आता मुख्य भूमिकेत झळकणार, 'या' अभिनेत्याला केलं रिप्लेस
'तारक मेहता का उल्टा चष्मा' या लोकप्रिय मालिकेला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले. यासोबत शोमधील कलाकारांनी शो सोडल्यानंतरही चाहत्यांचे त्यांच्यावर असलेले प्रेम तसूभरही कमी झालेले नाही. या मालिकेत 'टप्पू'ची भूमिका साकारून घराघरांत पोहोचलेला अभिनेता राज अनादकट सध्या पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. राज लवकरच सोनी सबवरील एका नवीन मालिकेत मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, राज अनादकटने सोनी सबच्या आगामी प्रोजेक्टमध्ये अभिनेता अविनाश मिश्राची जागा घेतली आहे. शोमधील या अचानक झालेल्या बदलाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. एका लोकप्रिय कॉमेडी शोमधील भूमिकेतून बाहेर पडून थेट मुख्य नायकाची भूमिका मिळाल्याने ही राजसाठी मोठी गोष्ट आहे. राज आता केवळ विनोदीच नव्हे तर वेगवेगळ्या धाटणीच्या भूमिका करण्यासाठी सज्ज आहे.
सोनी सबवर येणाऱ्या या नवीन मालिकेची निर्मिती 'इन्स्पायर फिल्म्स'ने केली आहे. या मालिकेत राज अनादकटची जोडी लोकप्रिय अभिनेत्री खुशी दुबे हिच्यासोबत जमणार आहे. राज आणि खुशी या दोघांचाही सोशल मीडिया आणि टीव्हीवर मोठा चाहता वर्ग आहे. या नवीन जोडीची ऑन-स्क्रीन केमिस्ट्री कशी असेल, याबाबत आतापासूनच सोशल मीडियावर चर्चा रंगू लागली असून प्रेक्षक त्यांना एकत्र पाहण्यासाठी आतुर आहेत.
जरी अद्याप या मालिकेच्या कथानकाबद्दल अधिकृत माहिती समोर आली नसली, तरी यातील तगड्या कास्टिंगमुळे प्रेक्षकांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. राज अनादकटला त्याच्या दमदार स्क्रीन प्रेझेन्ससाठी ओळखले जाते, तर खुशी दुबेनेही आपल्या अभिनयाने यापूर्वीच प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. या दोघांना एकाच फ्रेममध्ये पाहणे ही चाहत्यांसाठी एक मोठी मेजवानी ठरणार आहे.
'तारक मेहता...' मधील टप्पूच्या भूमिकेने राजला एक मजबूत फॅन बेस मिळवून दिला आणि तो तरुणांमध्ये प्रचंड लोकप्रिय झाला. आता मुख्य नायकाच्या भूमिकेत झळकणे ही राजच्या करिअरसाठी एक नवी आणि मोठी भरारी ठरू शकते. राजचा हा नवा अवतार आणि त्याची नवी मालिका टीआरपीचे कोणते विक्रम मोडणार, हे पाहणे आता औत्सुक्याचे ठरेल.