"शिव्या नको, १०० तोफांची सलामी द्या" अभिनेत्यानं फोनवर बोलत ड्रायव्हिंग करणाऱ्यांची केली कानउघडणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2025 15:25 IST2025-05-21T15:25:14+5:302025-05-21T15:25:27+5:30
स्वप्नील राजशेखर यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे.

"शिव्या नको, १०० तोफांची सलामी द्या" अभिनेत्यानं फोनवर बोलत ड्रायव्हिंग करणाऱ्यांची केली कानउघडणी
Swapnil Rajshekhar: गाडी चालवताना फोनवर बोलणं हे केवळ चुकीचं नाही, तर अपघाताचं मोठं कारण ठरू शकतं. हे अनेकांना माहीत असूनही रस्त्यावर अशी दृश्यं रोजच पाहायला मिळतात. अनेक वेळा लोक अशा बेजबाबदार वागणुकीवर संताप व्यक्त करतात. पण प्रसिद्ध मराठी अभिनेते स्वप्नील राजशेखर यांनी यावर वेगळाच दृष्टिकोन मांडला आहे.
स्वप्नील राजशेखर यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये काही लोक दुचाकी चालवताना फोनवर बोलतान दिसून येत आहे. या व्हिडीत राज शेखर हे कार चालवताना दिसत आहेत. ते म्हणाले, "हे जे चालत्या टू व्हीलर वरून एका कानाला फोन लावून गाडी चालवणारी माणसं असतात ना, ती काही साधीसुधी माणसं नसतात. तुम्ही यांना सामान्य माणसं समजू नका. ही खूप महत्त्वाची माणस आहेत. त्यांच्यावर खूप महत्त्वाचं काम सोपवलेलं आहे, असं मला वाटतं. म्हणजे आपल्या देशाची सुरक्षा जवळपास यांच्याच हातात आहे. आपले अँटी टेरिरिझम स्कॉड आहे ना, त्याचे स्लीपर आहेत".
पुढे ते म्हणाले, "शत्रू राष्ट्राच्या कुठे कुठे विघातक कारवाया आपल्या देशात चालू आहेत, कुठे अतिरेकी कारवाया करायचं त्यांच प्लॅनिंग चालू आहे या सगळ्याची माहिती ही माणसं काढतात. त्या माहितीचा सुगावा लागाला की लगेच चालत्या टू व्हीलरवरून ते थेट पीएमओ ऑफिसला फोन लावतात. अशी-अशी माहिती मिळाली आहे आणि इथे बॉम्ब फुटणार आहे, अशी माहिती थेट पंतप्रधानांकडे जाते. यांनी दिलेल्या माहितीनंतर तो बॉम्ब निकामी केला जातो".
स्वप्नील राजशेखर म्हणाले, "त्यांना एवढाही मिळत नाही की बाजूला उभं राहून बोलावं, कारण, तेवढ्यात बॉम्ब फुटला तर करायचं काय, त्यामुळे ही माणसं चालत्या गाडीवरून बोलत जातात. स्वतःचा आणि दुसऱ्याचा जीव धोक्यात घालतात. एवढा धोका ते आपल्यासाठी पत्कारतात असा माझा अंदाज आहे. त्यामुळे चालता गाडीवर एका कानाला फोन लावून जाणारी माणसं दिसली, तर त्यांच्यावर चिडू नका, त्यांना शिव्या घालू, तुम्ही त्यांना सलाम ठोका", या शब्दात त्यांनी गाडी चालवताना फोनवर बोलणाऱ्यांची कानउघडणी केली.