सुयश टिळकच्या गाडीचा अपघात, व्हिडीओ शेअर करत सांगितली परिस्थिती
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2025 13:56 IST2025-08-10T13:53:39+5:302025-08-10T13:56:39+5:30
कार अपघातानंतर सुयश टिळकची पोस्ट चर्चेत!

सुयश टिळकच्या गाडीचा अपघात, व्हिडीओ शेअर करत सांगितली परिस्थिती
सुयश टिळक (Suyash Tilak) हा मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता आहे. 'का रे दुरावा' (Ka Re Duarava) मालिकेतून घराघरात पोहोचलेल्या सुयशने अनेक नाटक व चित्रपटांमध्ये काम केलं आहे. सुयश टिळक सध्या चर्चेत आला आहे. त्याने सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमधून सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. अभिनेत्याच्या कार अपघात झाला आहे. याची माहिती त्याने पोस्ट शेअर करत दिली आहे. यामधून सुयशने अपघाताच्या घटनेबाबत सविस्तर लिहलंय. यासोबतच तो सुरक्षित असल्याचंही त्यानं सांगितलं.
सुयशला आणि इतर कुणालाही या अपघातामध्ये सुदैवाने दुखापत झाली नाही. मात्र, अपघातानंतर त्याची गाडी पूर्णपणे बंद पडली होती. त्यामुळे सुयशला ६-७ तास टोइंग ट्रकमध्ये बसून मुंबई गाठावी लागली. हा अनुभव त्याने सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यानं लिहलं, "वाहन न चालवता केलेला सर्वात लांबचा प्रवास... थोडासा अपघात झाला, पण सुदैवाने कुठलीही दुखापत झाली नाही. मात्र, झालेल्या नुकसानामुळे माझी गाडी अक्षरशः बंद पडली. मला किंवा इतर कुणालाही दुखापत झाली नाही, याबद्दल मी कृतज्ञ आहे. पण ही घटना अशा ठिकाणी घडली जिथे मला कोणतीही मदत मिळत नव्हती".
पुढे तो म्हणाला, "घरी जाण्याचा एकमेव मार्ग म्हणजे गाडी टो करून थेट मुंबईत आणणे. साधारण तासभर प्रतीक्षा केल्यानंतर मदत पोहोचली. टो ड्रायव्हर म्हणाला, "तुम्ही आत बसा, गाडीला कधी मदतीची गरज भासली तर. मदत काय? गाडी तर श्वासही घेऊ शकत नव्हती! मग मी बसलो होतो एका शांत, एसी नसलेल्या माझ्या गाडीत. ६-७ तास महामार्गावरून ओढत नेलं जाणार होतं. रस्त्यावरचे लोक आत डोकावत, काही जण माझ्या अवस्थेवर हसत होते, तर काही कदाचित काय झालं असेल याचा अंदाज बांधत होते".
तो म्हणाला, "मी रागावू शकलो असतो, चिडलो असतो, वैतागलो असतो. पण कधी कधी आयुष्य तुमच्यासमोर जी परिस्थिती आणतं, ती तशीच स्वीकारावी लागते. मी पुस्तक वाचलं, संगीत ऐकलं, थोडा झोपलो. या असामान्य हलत्या सीटवरून जग सरकताना पाहिलं. दिवसभराचा अनुभव मोबाईलमध्ये टिपला आणि तो एडिट करून मिनी व्लॉग बनवला. तुम्ही या व्लॉगचा आनंद घ्या". सुयशनं पोस्टच्या शेवटी लिहलं, "कधी कधी, आयुष्य तुम्हाला खेचत नेतं, तुम्हाला आवडो वा न आवडो. तुम्ही तो प्रवास रागाने घालवू शकता… किंवा खिडकी उघडून..खोल श्वास घेऊन.. तो प्रवास एन्जॉय करू शकता".