सुरेखा कुडची या प्रसिद्ध अभिनेत्रीला मानतात गुरू, म्हणाल्या - "कुणीतरी आपल्यावर विश्वास ठेवून..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2025 13:03 IST2025-09-05T13:02:23+5:302025-09-05T13:03:13+5:30
Surekha Kudchi : सध्या सुरेखा कुडची या सध्या 'जुळली गाठ गं' या मालिकेत काम करत आहेत. शिक्षक दिनानिमित्त सिनेसृष्टीतील त्यांच्या गुरूबद्दल त्यांनी भावना व्यक्त केल्या आहेत.

सुरेखा कुडची या प्रसिद्ध अभिनेत्रीला मानतात गुरू, म्हणाल्या - "कुणीतरी आपल्यावर विश्वास ठेवून..."
सुरेखा कुडची (Surekha Kudachi) या मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री आहेत. वेगवेगळ्या मालिका, चित्रपटांतून त्यांनी आपल्या अभिनयाने रसिकांच्या मनावर ठसा उमटवला आहे. सुरेखा कुडची 'बिग बॉस मराठी ३' मध्येही सहभागी झाल्या होत्या. 'फॉरेनची पाटलीण', 'पहिली शेर - दुसरी सव्वाशेर - नवरा पावशेर' चित्रपटांमध्ये सुरेखा कुडची यांनी साकारलेल्या भूमिका रसिकांना भावल्या आहेत. सध्या सुरेखा कुडची या सध्या 'जुळली गाठ गं' या मालिकेत काम करत आहेत. शिक्षक दिनानिमित्त सिनेसृष्टीतील त्यांच्या गुरूबद्दल त्यांनी भावना व्यक्त केल्या आहेत.
सुरेखा कुडाची म्हणाल्या की, वयाच्या २२ व्या वर्षी अभिनयाचा काहीच अनुभव नसताना दिवंगत अभिनेत्री जयश्री गडकर यांच्या 'अशी असावी सासू' या चित्रपटासाठी त्यांनी माझी निवड केली. खरतर या पूर्वी मी कधी अभिनय केला नव्हता त्यात मराठी भाषा शुद्ध नव्हती. माझी निवड करताना त्यांनी खूप विचार केला सुरवातीला नकार दिला पण त्यानंतर त्यांनी मला सुनेच्या पात्रासाठी निवडलं.
आमचं कोल्हापूर मधलं शूटिंग झाल्यानंतर त्यांनी मला जवळ घेऊन सांगितलं, सुरेखा या भूमिकेसाठी मी तुला नाही म्हणून सांगितलं होत. पण आता मीच तुला सांगते मराठीवर काम कर, तू स्क्रीनवर उत्तम दिसते, उंची परफेक्ट आहे जर तू स्वतःवर मेहनत घेतली तर या क्षेत्रात तू खूप काळ काम करू शकते. आज जयश्री बाईंनी मला काम करण्याची संधी दिली नसती तर अभिनय क्षेत्रात मी अजूनही स्ट्रगल करत राहिले असते. त्यांच्याकडून मी बरचं काही शिकले आहे. त्या चित्रपटात कमी वयात खूप दिग्गज कलाकारांबरोबर मी काम केलं आहे. अनुभव नसताना कुणीतरी आपल्यावर विश्वास ठेवून पहिली संधी देणं खूप महत्त्वाचं आहे, असे सुरेखा कुडची यांनी सांगितलं.