मराठी अभिनेत्री वृंदावनात रमली; परत आल्यावर म्हणते, "मुंबई आता आपलीशी वाटत नाही..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2025 14:18 IST2025-10-21T14:17:27+5:302025-10-21T14:18:29+5:30
आईला सांगून वृंदावनात गेली अन् ३ महिने आलीच नाही..., कोण आहे ही अभिनेत्री?

मराठी अभिनेत्री वृंदावनात रमली; परत आल्यावर म्हणते, "मुंबई आता आपलीशी वाटत नाही..."
'अधुरी एक कहाणी', 'काटा रुते कुणाला' या मराठी मालिकांमध्ये दिसलेली स्नेहा वाघ (Sneha Wagh) आठवतेय? काही मराठी मालिका केल्यानंतर ती हिंदीत गेली. गेल्याच वर्षी तिची 'नीरजा' ही मालिका संपली. त्याआधी तिने अनेक हिंदी मालिका केल्या. मात्र आता स्नेहा वृंदावनात रमली आहे. श्रीकृष्णाच्या भक्तीत ती तल्लीन झाली आहे. त्यामुळे ती केवळ कामासाठीच मुंबईत येते. एरवी ती वृंदावनातच स्थायिक झाली आहे. मुंबईत आता तिला करमत नाही असं ती म्हणाली आहे.
'मज्जा पिंक'ला दिलेल्या मुलाखतीत स्नेहा वाघ म्हणाली, "मला एक दिवस वृंदावनातून आमंत्रण आलं होतं. मी तिथे गेले आणि तीन दिवसात इतक्या गोष्टी घडल्या. मी जेव्हा परत आले तेव्हा मला मुंबई आपली वाटली नाही. माझं घर आपलं वाटलं नाही. बेडही आपला वाटला नाही. मला झोपता यायचं नाही. सकाळी ५ वाजता उठायचे आणि म्हणायचे की मी चुकीच्या जागेवर आले आहे. कारण वृंदावनला सकाळी ५ वाजता मंगला आरती होते. मी फोनवर मंगला आरती दिसतेय हे चेक करायचे. मला इकडे राहणं जमलंच नाही. कसेबसे १५ दिवस काढले."
"मग एक दिवस मी आईला म्हटलं की वृंदावनात एक उत्सव होतोय तर मी तिथे जाते. आईला वाटलं ही आठवडाभर जाईल आणि येईल. मी गेले आणि मी ३ महिने आलेच नाही. मी तिथे इतकी रमले की मला असं वाटायला लागलं की हेच आपलं आयुष्य आहे. मी जिथे राहते ती सगळी मोहमाया आहे. मला आजूबाजूची लोकंही फेक वाटायला लागली होती. मग मला मुंबईतील गणेशगल्लीमध्ये बाप्पााच्या पाद्यपूजनासाठी आमंत्रण आलं. त्यासाठी मी आले नाहीतर मी आलेच नसते."