गायक शानचे १४ वर्षांनंतर छोट्या पडद्यावर कमबॅक, जाणून घ्या याबद्दल
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2022 18:26 IST2022-05-02T18:26:23+5:302022-05-02T18:26:50+5:30
Singer Shaan: बॉलिवूडमधील प्रसिद्ध गायक शान रिएलिटी शोचे सूत्रसंचालन करताना दिसणार आहे.

गायक शानचे १४ वर्षांनंतर छोट्या पडद्यावर कमबॅक, जाणून घ्या याबद्दल
बॉलिवूडमधील प्रसिद्ध गायक शान (Singer Shaan) तब्बल १४ वर्षानंतर छोट्या पडद्यावर पुनरागमन करतो आहे. तो पहिल्यांदाच स्टार भारत वाहिनीवरील आगामी रिएलिटी शो स्वयंवर 'मीका दी वोटी'चे सूत्रसंचालन करताना दिसणार आहे. नॉनफिक्शन शो 'स्वयंवर - मीका दी वोटी'च्या माध्यमातून मीका सिंग (Mika Singh) त्यांची लाइफ पार्टनर शोधण्याच्या प्रवासाला सुरुवात करणार आहेत. यादरम्यान, मिकाचा भाऊ आणि त्याचा अगदी जिगरी यार आणि प्रेक्षकांचा आवडता गायक शान मिकाला वधू शोधण्यासाठी मदत करणार आहे.
या शोबद्दल शान म्हणाला की, ज्या दिवशी मी ऐकले की माझा जिवलग मित्र, माझ्या भावाने त्याच्या नववधूचा शोध घेण्याचे ठरवले आहे. ज्यामध्ये त्याला माझी मदत हवी आहे आणि मला माझ्या भावाचा स्वयंवर आयोजित करायचा आहे, मी पटकन या सुवर्ण संधीला हो म्हणालो. माझ्या भावासाठी योग्य व्यक्ती शोधण्याच्या या प्रवासाबद्दल मी खूप उत्सुक आहे. जो त्याला समजू शकेल आणि त्यावर विश्वास ठेवू शकेल. शोच्या दृष्टीकोनातून हा शो मी यापूर्वी केलेल्या सर्व शोपेक्षा पूर्णपणे वेगळा आहे. यासंधीसाठी मी स्टार भारत चे आभार मानू इच्छितो आणि मी या शोची वाट पाहत आहे.
तो पुढे म्हणाला की, आम्ही एकमेकांना एका दशकाहून अधिक काळापासून ओळखतो आणि आम्हाला एकमेकांच्या कामाचे आणि सर्जनशीलतेचे खूप कौतुक आहे. आम्ही एकत्र घालवलेला वेळ म्हणजे आम्ही वेगवेगळ्या प्रसंगी विविध टीव्ही शोमध्ये जज झालो आहोत. आमचे नाते आमच्या व्यावसायिक संबंधांच्या पलीकडे आहे, मिका माझ्या आणि माझ्या पत्नीसाठी कुटुंबासारखे आहे. याची झलक तुम्हाला 'स्वयंवर-मिका दी वोटी' या आगामी शोमध्ये पाहायला मिळेल.
'स्वयंवर-मिका दी वोटी' ही माझ्यासाठी अनोखी संधी आहे. मी अनेक म्युझिक रिअलिटी शोमध्ये होस्ट म्हणून भूमिका साकारली आहे, परंतु अशा वेगळ्या संकल्पनेसह माझ्याशी संपर्क साधण्याची ही पहिलीच वेळ आहे. एक कलाकार म्हणून मला नवीन गोष्टी एक्सप्लोर करायला आणि शिकायला आवडतात आणिही एक आव्हानात्मक संधी देखील आहे. मी या अनोख्या प्रवासाची वाट पाहत आहे, असेही शान म्हणाला. 'स्वयंवर - मिका दी वोटी' हा शो लवकरच आपल्या टेलिव्हिजन पाहायला मिळणार आहे. शान आणि मिकाचा बाँड पाहण्यासाठी प्रेक्षक खूप उत्सुक आहेत.