सिद्धार्थ चांदेकरची रियल आई बनली रिल आई, जाणून घ्या याबद्दल
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2019 18:40 IST2019-03-26T18:40:00+5:302019-03-26T18:40:00+5:30
मराठी चित्रपटसृष्टीतील चॉकलेट बॉय म्हणजेच अभिनेता सिद्धार्थ चांदेकर तब्बल ९ वर्षानंतर छोट्या पडद्यावर पुनरागमन करणार आहे.

सिद्धार्थ चांदेकरची रियल आई बनली रिल आई, जाणून घ्या याबद्दल
मराठी चित्रपटसृष्टीतील चॉकलेट बॉय म्हणजेच अभिनेता सिद्धार्थ चांदेकर लवकरच स्टार प्रवाह वाहिनीवर सुरू होणाऱ्या 'जीवलगा' मालिकेत मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तो तब्बल ९ वर्षानंतर छोट्या पडद्यावर पुनरागमन करणार आहे. सिद्धार्थसाठी ही मालिका खूप स्पेशल आहे. कारण त्याची आई सीमा चांदेकरदेखील या मालिकेत काम करताना दिसणार आहे. या मालिकेत त्या सिद्धार्थच्या आईची भूमिका साकारताना दिसणार आहेत. ही माहिती खुद्द सिद्धार्थने सोशल मीडियावर दिली आहे.
सिद्धार्थने सोशल मीडियावर आपल्या आईसोबतचा फोटो शेअर करीत म्हटले की, ओळखा कोण आहे? पहिल्यांदाच खऱ्या जीवनातील आई बनली मालिकेतील खरी आई.
'जिवलगा' ही मालिका एका आगळी-वेगळी प्रेमकथेवर भाष्य करणारी आहे. “जो डोळे बंद केल्यावरही दिसतो, तो जिवलगा…ज्याच्यामुळे आपण आहोत, तो जिवलगा…,” अशा आशयाची ही प्रेमकथा आहे. यात सिद्धार्थसोबत स्वप्नील जोशी, अमृता खानविलकर आणि मधुरा देशपांडे हे कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. सिद्धार्थ व त्याच्या आईला एकत्र काम करताना पाहणे कमालीचे ठरणार आहे.
'जिवलगा' या मालिकेची संकल्पना सतीश राजवाडे यांची आहे. डॉ. चंद्रशेखर फणसळकरांच्या गोष्टीपासून प्रेरणा घेतलेली ही मालिका आहे. विद्याधर पाठारे यांनी या मालिकेची निर्मिती केली असून पराग कुलकर्णी यांनी या मालिकेचे लेखन केले आहे. ही मालिका उमेश नामजोशी यांनी दिग्दर्शित केली आहे. ‘जिवलगा’ मालिका ८ एप्रिलपासून सोमवार ते शनिवार रात्री ८.३० वाजता फक्त स्टार प्रवाहवर पाहायला मिळणार आहे.