'बलराम'च्या भूमिकेतून मिळाली लोकप्रियता, 'श्री कृष्णा'मधील हा अभिनेता होता प्रसिद्ध क्रिकेटर
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2025 16:19 IST2025-05-16T16:18:45+5:302025-05-16T16:19:12+5:30
Deepak Dewoolkar : अभिनेता दीपक देऊळकर यांनी रामानंद सागर यांच्या 'श्री कृष्णा' मालिकेत भगवान कृष्णाचा मोठा भाऊ बलराम यांची भूमिका साकारली होती.

'बलराम'च्या भूमिकेतून मिळाली लोकप्रियता, 'श्री कृष्णा'मधील हा अभिनेता होता प्रसिद्ध क्रिकेटर
रामानंद सागर यांच्या 'रामायण' (Ramayana) या टीव्ही मालिकेसोबतच, त्यांची दुसरी हिट मालिका 'श्री कृष्णा'नेही प्रेक्षकांच्या मनावर खोलवर छाप सोडली. ९०च्या दशकात प्रसारीत झालेल्या या मालिकेने प्रत्येक कलाकाराला त्यांच्या भूमिकांमधून घराघरात लोकप्रियता मिळवून दिली. भगवान कृष्णाची भूमिका सर्वदमन डी. बॅनर्जी आणि त्यांचा मोठा भाऊ बलराम यांची भूमिका करणारा अभिनेता दीपक देऊळकर (Deepak Dewoolkar) यांनी साकारली होती. या दोघांनी आपल्या भूमिकांमधून रसिकांच्या मनात स्थान निर्माण केलं. दीपक देऊळकर अभिनयापूर्वी एक वेगळ्या क्षेत्रात कार्यरत होते.
अभिनेता दीपक देऊळकर यांनी रामानंद सागर यांच्या 'श्री कृष्णा' मालिकेत भगवान कृष्णाचा मोठा भाऊ बलराम यांची भूमिका साकारली होती. दीपक देऊळकर यांनी अनेक मालिकांमध्ये काम केले आहे, परंतु त्यांना खरी ओळख 'कृष्णा' मधून मिळाली. आजही लोक त्यांना बलराम म्हणून ओळखतात. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की दीपक देऊळकर हे क्रिकेटमध्येही तरबेज होते. ते मुंबईच्या अंडर-१९ क्रिकेट संघाचे यशस्वी फिरकी गोलंदाज राहिले आहेत. जर दीपक अभिनेते नसते तर ते क्रिकेटच्या मैदानावर असते, परंतु एका अपघातानंतर त्यांचा क्रिकेट प्रवास संपुष्टात आला. एका सामन्यादरम्यान चेंडू त्यांच्या हाताला लागला आणि त्यांची बोटं तुटली, ज्यामुळे त्यांची क्रिकेट कारकीर्द संपली आणि त्यांना संघातून वगळण्यात आले.
सध्या काय करताहेत दीपक देऊळकर?
दीपक देऊळकर आता अभिनय क्षेत्रात सक्रिय आहेत, जरी ते हिंदी चित्रपट आणि मालिकांमध्ये दिसत नाहीत. पण ते मराठी चित्रपट आणि मालिकांमध्ये काम करत आहे. 'लेक लाडकी या घरची' या मराठी मालिकेत महादेवची भूमिकेतून त्यांना विशेष ओळख मिळाली. याशिवाय, दीपक एक पटकथा लेखक देखील आहेत आणि त्यांनी 'साद' चित्रपटाची कथा लिहिली आहे.
याशिवाय, ते मराठी संगीत वाहिनी 'संगीत मराठी'चे प्रमुख देखील आहेत. त्यांनी 'स्ट्रॉबेरी प्रॉडक्शन प्रायव्हेट लिमिटेड' नावाच्या कंपनीत सीईओ म्हणूनही काम केले. दीपक देऊळकर यांचे लग्न प्रसिद्ध मराठी टीव्ही अभिनेत्री निशिगंधा वाड यांच्याशी झाले आहे, ज्यांनी अनेक मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केले आहे.