कॅन्सरग्रस्त आईसाठी झाला श्रावण बाळ! अमृताने सांगितला 'पारू' फेम अभिनेता प्रसाद जवादेचा भावुक प्रसंग
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2025 11:45 IST2025-10-08T11:44:40+5:302025-10-08T11:45:49+5:30
Prasad Jawade And Amruta Deshmukh : झी मराठी पुरस्कार सोहळा लवकरच प्रेक्षकांना टीव्हीवर पाहायला मिळणार आहे. पुरस्कार स्वीकारतेवेळी प्रसाद जवादेची पत्नी अमृता देशमुख हिने डोळ्यात पाणी आणणारा एक किस्सा शेअर केला.

कॅन्सरग्रस्त आईसाठी झाला श्रावण बाळ! अमृताने सांगितला 'पारू' फेम अभिनेता प्रसाद जवादेचा भावुक प्रसंग
झी मराठी पुरस्कार सोहळा लवकरच प्रेक्षकांना टीव्हीवर पाहायला मिळणार आहे. नुकताच झी मराठीवरील मालिकांच्या नॉमिनेशनचा सोहळा पार पडला. या सोहळ्यातील काही भावनिक क्षणांचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या पुरस्कार कार्यक्रमांमध्ये कलाकारांच्या आयुष्यातील महत्त्वाच्या व्यक्तींनीही रंगमंचावर उपस्थिती लावली होती. यावेळी 'पारु' मालिकेतील आदित्य म्हणजेच अभिनेता प्रसाद जवादे याने एक पुरस्कार जिंकला. तो पुरस्कार स्वीकारताना त्याची पत्नी अभिनेत्री अमृता देशमुख आणि त्याची आई दोघीही उपस्थित होत्या.
पुरस्कार स्वीकारतेवेळी प्रसादची पत्नी अमृता देशमुख हिने डोळ्यात पाणी आणणारा एक किस्सा शेअर केला. तिने सांगितले की, प्रसादच्या आईला कॅन्सरचे निदान झाले आहे. शूटिंग, घर, आईची तब्येत, आणि बायकोसाठी वेळ अशा सर्व गोष्टी प्रसाद कसा अत्यंत उत्तमपणे सांभाळतो, याबद्दल अमृताने भरभरून आणि अभिमानाने सांगितले. अमृता म्हणाली, "गेल्यावर्षी दिवाळीमध्ये काकूंना कॅन्सरचे पुन्हा निदान झाले आहे, हे आम्हाला कळले. काकूंचे स्वप्न होते की प्रसादला पुन्हा एकदा रोज टीव्हीवर किंवा एखाद्या डेली सोपमध्ये पाहायचे आहे. एकीकडे 'पारु'चं शूट सुरू होतं आणि दुसरीकडे आम्ही त्यांच्यावर लगेचच ट्रीटमेंट सुरू केली. प्रसाद यांनी पाहिलेला आहे... म्हणजे जी व्यक्ती कधीकधी अतिशय बालिश वाटू शकते, जो आधी बोलतो नंतर विचार करतो, मग त्याला त्याचा त्रास होतो... असे त्याचे खूप पैलू आहेत. पण जेव्हा मी त्याला काकूंचाच वडील झालेलं पाहिलं, तेव्हा मला त्याची एक वेगळी बाजू दिसली."
पुढे प्रसाद जवादेची आई म्हणाल्या, "माझ्यासाठी तर हॉस्पिटलमध्येच सगळ्यांनी त्याचं नाव 'श्रावण बाळ' पाडलं आहे. आणि खरोखरच तो श्रावण बाळासारखाच आहे. आधुनिक काळातला तो श्रावण बाळ आहे! म्हणजे त्याला जे पारितोषिक मिळालं आहे ते अगदी तंतोतंत खरं आहे." आई आणि पत्नी हे बोलत असताना प्रसादच्या डोळ्यांत अश्रू दाटून आलेले दिसले. प्रसादच्या आईच्या बोलण्यावरून असे वाटते की, त्याला या पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट मुलाचा (श्रावणबाळ) अवॉर्ड मिळाला आहे. प्रसाद आणि अमृता यांच्याबद्दल बोलायचं झाल्यास, बिग बॉस मराठीमध्ये दोघांची ओळख झाली आणि सूत जुळले. बिग बॉसमधून बाहेर आल्यावर दोघांनी साखरपुडा झाल्याचे जाहीर केले आणि काही काळातच त्यांचे लग्न झाले.