'टोमॅटो फ्रिजमध्ये ठेवू की...' हास्यजत्रा फेम श्रमेश बेटकरची महागाईवर पोस्ट व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2023 17:07 IST2023-07-08T17:05:51+5:302023-07-08T17:07:20+5:30
टोमॅटोला सध्या सोन्याचाच भाव आलाय असं म्हणायला हरकत नाही.

'टोमॅटो फ्रिजमध्ये ठेवू की...' हास्यजत्रा फेम श्रमेश बेटकरची महागाईवर पोस्ट व्हायरल
महागाईमुळे कधी कशाचे भाव वाढतील सांगता येत नाही. त्यात भाज्यांचे दर वाढले की गृहिणींचं बजेट कोलमडतं. नेहमी कांदा रडवतो पण आता इथे टोमॅटो सुद्धा रडवतोय. कारणही असंच आहे. टोमॅटोचे भाव अक्षरश: गगनाला भिडलेत. टोमॅटो सध्या बाजारात 120 रुपये किलोने मिळत आहेत. यावर 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम कलाकार श्रमेश बेटकरने (Shramesh Betkar) सोशल मीडियावर लिहिलेली पोस्ट व्हायरल होतेय.
टोमॅटोला सध्या सोन्याचाच भाव आलाय असं म्हणायला हरकत नाही. कोणत्याही भाजीमध्ये, भेळेत किंवा सॅलडमध्ये लागणारे टोमॅटो विकत घेतानाही आता विचार करावा लागतोय. सध्या संपूर्ण राज्यातच टोमॅटो १२० ते १५० रुपये किलो दराने मिळत आहेत. त्यामुळे सामान्य जनता त्रस्त आहे. दरम्यान हास्यजत्रा फेम श्रमेश बेटकरने गंमतीतच सोशल मीडियावर लिहिले, 'सकाळपासून एकच गोष्ट कळत नाहीए, टोमॅटो फ्रिजमध्ये ठेवू की बँकेत?? #महागाई'
श्रमेशने सामान्य नागरिकांच्या मनातलीच व्यथा या पोस्टमधून लिहिली आहे. पावसाळा आल्याने आणि आवक कमी झाल्याने हे दर इतके वाढले असल्याचं विक्रेत्यांनी सांगितलंय. टोमॅटोचे वाढते भाव बघता अगदी 'मॅगडोनल्ड्स' सारख्या प्रसिद्ध आऊटलेटनेही आपल्या बर्गरमध्ये टोमॅटो नसतील असं स्पष्ट केलं आहे. 'महंगाई डायन खाए जात है' असंच म्हणायची आता वेळ आली आहे.