शिल्पा शेट्टी सांगतेय या व्यक्तीमुळेच मी बॉलिवूडमध्ये करियर करू शकले

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2018 06:30 IST2018-10-13T16:36:40+5:302018-10-15T06:30:00+5:30

सपनें सिर्फ अपनें नहीं होते अशी यंदाच्या डान्स प्लसची टॅगलाईन आहे. याच मंचावर नुकतीच अभिनेत्री शिल्पा शेट्टी उपस्थित राहिली होती.

Shilpa Shetty give full credit to her mother for her Bollywood Success | शिल्पा शेट्टी सांगतेय या व्यक्तीमुळेच मी बॉलिवूडमध्ये करियर करू शकले

शिल्पा शेट्टी सांगतेय या व्यक्तीमुळेच मी बॉलिवूडमध्ये करियर करू शकले

डान्स प्लस या लोकप्रिय डान्स शोचा चौथा सिझन सध्या प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. सपनें सिर्फ अपनें नहीं होते अशी यंदाच्या सिझनची टॅगलाईन आहे. याच मंचावर नुकतीच अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिची आई सुनंदा शेट्टी यांनी उपस्थिती लावली. शिल्पाने सांगितले की, तिच्या आईला कॅमेऱ्यासमोर झळकायला आवडत नाही. पण डान्स प्लस या कार्यक्रमासाठी ती खास आली आहे. कारण तिची आईच तिच्या आयुष्यातील प्लस असून या कार्यक्रमात तिची उपस्थिती गरजेची होती. शिल्पाच्या आईने तिच्यासाठी खूप त्याग केले आहेत आणि शिल्पाची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी नेहमीच प्रयत्न केले आहेत. जेव्हा शिल्पाने बॉलीवूडमध्ये काम करायला सुरूवात केली, तेव्हा तिच्या वडिलांनी तिला केवळ एकच अट घातली की, चित्रीकरणाला तिच्यासोबत तिची आई असेल आणि त्यासाठी शिल्पाच्या आईने आपली नोकरी सोडली आणि शिल्पाला पूर्ण पाठिंबा दिला.
 
आपल्या आईचे आभार मानत शिल्पा म्हणाली, “माझी आई माझा प्लस आहे. मी डान्स प्लसचे आभार मानते की, त्यांनी आम्हाला इथे एकत्र आणले आणि आमच्या स्मरणात राहिल अशी ही आठवण निर्माण केली. कुठल्याही टेलिव्हिजन शोमध्ये प्रथमच माझी आई माझ्या बाजूला बसली आहे. लोकांनी माझे यश पाहिले आहे. पण त्यामागची धडपड नाही. त्या कठोर परिश्रमांमध्ये माझी आई माझा आधारस्तंभ होती. ती अगदी लहानपणापासून माझ्यासाठी सगळं करत आली आहे. माझ्या आयुष्यात जेव्हा कधी मी निराश झाले तेव्हा माझ्या आईने मला सांगितले की मी बॉर्न सर्व्हायव्हर आहे. माझ्या गरोदरपणात काही समस्या निर्माण झाल्या होत्या आणि डॉक्टरांनी सांगितले होते की मी वाचणार नाही. त्यावेळी तिनेच मला आधार दिला.”
 
याविषयी सुनंदा शेट्टी सांगतात, “शिल्पाने आजपर्यंत जे काही केले आहे त्यात तिने खूप मेहनत घेतली आहे आणि आज तिने तिच्या आईवडिलांची मान उंचावली आहे. ती सर्वोत्तम आहे. ती खूप प्रगल्भ आहे. ती एक उत्तम पत्नी आणि उत्कृष्ट आई आहे.”
 
 

Web Title: Shilpa Shetty give full credit to her mother for her Bollywood Success

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.